मजुरीच्या बदल्यात मिळणार गहू
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने देशातून उपासमारी संपविण्यासाठी फूड फॉर वर्क स्कीम सुरू केली आहे. योजनेच्या अंतर्गत मजुरांना मजुरीऐवजी गहू देण्यात येणार आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी दक्षिण काबूलमध्ये पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.
अफगाणिस्तानातील सर्व मोठय़ा शहरांमध्ये ही योजना लागू होईल. केवळ काबूलमध्येच 40 हजार लोकांना रोजगार मिळेल. बेरोजगारी संपविण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. पण याचा लाभ घेण्यासाठी मजुरांना मोठी मेहनत करावी लागणार असल्याचे मुजाहिद म्हणाले.
फूड फॉर वर्क स्कीम
अफगाणिस्तान यापूर्वीच गरीबी, दुष्काळ आणि विजेच्या टंचाईला तोंड देतोय. तेथील अर्थव्यवस्थेची स्थिती खालावली आहे. पूर्वीपासून काम करत असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. हिवाळय़ात बेरोजगारीमुळे उपासमारीचे बळी ठरू शकणाऱया मजुरांनाच याचा लाभ मिळणार असल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे.
काबूलमध्ये होणार वाटप
योजनेच्या अंतर्गत काबूलमध्ये 11,600 टन, तर हेरात, जलालाबाद, कंधार, मजार-ए-शरीफ आणि पुल-ए-खुमरीमध्ये 55 हजार टन गहू वितरित केला जाणार आहे. काबूलमधील दुष्काळ संकट निवारणासाठी हे मजूर कालव्याची निर्मिती करणार आहे. तालिबानचे कृषिमंत्री अब्दुल रहमान रशीद आणि काबूलचे महापौर हमदुल्लाह नोमानी यांनी या योजनेचा शुभारंभ केला आहे.