अभयकुमार करडी क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित अभयकुमार करडी स्मृती चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एआयएमएस संघाने आनंद क्रिकेट अकादमी ब संघाचा 337 धावांनी पराभव करून 2 गुण मिळविले. इशान कुबडेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात एआयएमएस संघाने 45 षटकात 3 बाद 442 धावांचा डोंगर उभा केला. इशान कुबडेने 78, निरज जाधवने 9 चौकारासह नाबाद 71, साजिक खतिबने नाबाद 63 धावा केल्या. आनंदतर्फे गौतम ओझा व आयन मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमी ब संघाचा डाव 21.5 षटकात 84 धावात आटोपला. व्ही. रोहनने 18, हैदरअलीने 17 धावा केल्या. एआयएमएसतर्फे रूदेश कर्णिकने 17 धावात 3, पराग अरबेकरने 13 धावात 3 तर आरव मल्होत्राने 13 धावात 2 गडी बाद केले.