वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेच्या (एआयबीए) ऍथलीटस् समिती सदस्यपदाच्या शर्यतीमध्ये भारताची महिला मुष्टियोद्धा तसेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरोगेन आणि शिवा थापा नशीब आजमावतील. आशिया खंडातून हे दोन मुष्टियोद्धे ऍथलिटस् समिती सदस्यपदासाठी निवडणूक लढवित आहेत. बेलग्रेडमध्ये सध्या सुरू असलेल्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेवेळी या पदासाठी निवडणूक होणार आहे.
विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत शिवा थापा 63.5 वजनगटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. आसामच्या थापाने 2015 साली या स्पर्धेत कांस्य मिळविले होते. महिलांची विश्व मुष्टियुद्ध स्पर्धा येत्या डिसेंबरमध्ये तुर्कीत आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत लोव्हलिना सहभागी होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये लोव्हलिनाने कांस्य मिळविले होते तर मार्कवे स्पर्धेत तिने यापूर्वी दोन कांस्य पटकाविली आहेत.
एआयबीएकडे या निवडणुकीसाठी पाच विविध कॉन्फडरेशन्सकडून एकूण 34 अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी 27 अर्ज छाननीनंतर अधिकृत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ऍथलिट्स समिती सदस्यपदासाठी भारताच्या दोन उमेदवारांची या निवडणुकीत निवड झाली तर सलग दुसऱयांदा भारतीय उमेदवारांची वर्णी लागेल. यापूर्वी भारताची विश्वविजेती महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवीची 2019 साली या पदासाठी बिनविरोध निवड झाली होती. ऍथलिट्स समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश असणार आहे.