माणसांच्या भावना समजून घेणार
किंमत केवळ 2 लाख रुपये
जपानचे अब्जाधीश युसाकू मेजावा यांनी दोन वर्षांपूर्वी चंद्रावर जाण्यासाठी एका जोडीदाराचा जगभरात शोध सुरू करत प्रसिद्धी मिळविली होती. त्यांनी ही योजना मध्येच रोखून नवी घोषणा केली आहे. मेजावा यांनी मानवी भावना समजून घेत आणि एकटेपणा दूर करणारा रोबोट तयार करणाऱया स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
हा रोबोट माणसांमधील एकाकीपणा दूर करू शकतो आणि लोकांना भावनात्मक स्वरुपात आनंदी ठेवू शकतो असे मेजावा यांचे म्हणणे आहे. या रोबोटची किंमत 2 लाख रुपयांपासून सुरू होते, तसेच तो 6 हजार रुपयांच्या मासिक हप्त्यावरही विकत घेता येतो.
लोवोट नावाने उत्पादने करणाऱया ग्रूव एक्स या जपानी रोबोटिक्स स्टार्टअपमध्ये मेजावा यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा रोबोट कोरोना महामारीदरम्यान काही अडचणींमध्ये स्वकीयांपासून दूर रहावे लागलेल्या लोकांना साथ देण्यास यशस्वी ठरल्याचे ग्रूव एक्सने म्हटले आहे.
50 हून अधिक सेंसर
हा रोबोट 50 हून अधिक सेंसरने तयार झालेला असून यात माणसाची प्रत्येक भावना समजण्याची क्षमता आहे. सध्या हा रोबोट जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा रोबोट माणसांना नेहमी आनंदी आणि त्यांना तंदुरुस्त ठेवू शकतो. यांचा वापर रुग्णालयात मानसिक स्वरुपात त्रस्त रुग्णांना बरे करण्यासही केला जाऊ शकतो असा दावा मेजावा यांनी केला आहे. ग्रूव एक्स लवकरच जपानबाहेर या रोबोटची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
नर्सरी अन् प्रायमरी स्कुलसाठी उपयुक्त
जपानच्या इनोव्हेशन नेटवर्क कॉर्पोरेशननुसार लोवोट उपकरणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोना महामारीत आरोग्य देखभालीत ही उपकरणे उपयुक्त ठरली आहेत. यांचा वापर नर्सरी, किंडरगार्टन आणि प्राथमिक शाळांमध्ये मुलांचे लर्निंग स्किल वाढविणे आणि शिक्षणात त्यांची रुची वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. यासंबंधी करण्यात आलेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत.