लखनौ / वृत्तसंस्था
बसपा प्रमुख मायावती यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या युतीसंबंधीच्या वक्तव्याचा इन्कार केला. राहुल यांनी शनिवारी मायावतींना यूपीमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याची आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी मेसेजला उत्तर दिले नसल्याचा दावा केला होता. त्यावर प्रत्यारोप करताना मायावतींनी काँग्रेसला कडक शब्दात सुनावले आहे. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा आपले उद्ध्वस्त घर सांभाळावे. काँग्रेसची अवस्था भयभीत मांजरासारखी झाली आहे. अनेक नेते काँग्रेस सोडून जात आहेत. काँग्रेसने दलितांसाठी कधीच काही केले नाही, असे टीकास्त्र मायावतींनी सोडले आहे.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी बसपचा अपमान करत दिवंगत कांशीरामजींना सीआयए एजंट म्हटले होते. आता त्यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र राहुल गांधीही बसपावर भाजपशी संगनमताचा आरोप करून त्यांचा अपमान करत आहेत, असे मायावती म्हणाल्या. 2017 मध्ये सपा आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. तरीही राज्यात भाजपची सत्ता
आल्याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असे त्या पुढे म्हणाल्या.