जगातील एका अनोख्या गावात बहुतांश लोक एकाच किडनीवर जगत आहेत. या गावाचे नाव ‘किडनी व्हॅली’ आहे. तसेच याला किडनीवाले गाव म्हणून देखील ओळखले जाते. पण या गावाचे मूळ नाव होकसे असून ते नेपाळमध्ये आहे. स्वतःच्या या विचित्र कारणामुळे हे गाव जगभरात अत्यंत चर्चेत असते.
येथील जवळपास सर्वच लोक एका किडनीच्या मदतीने जगत आहेत. शरीरात एकच किडनी कार्यरत असल्याने या लोकांना अनेक गंभीर आरोग्यसंबंधी अडचणींना तोंड द्यावे लागते. किडनी व्हॅली नावाने प्रसिद्ध होकसे गावात गरीबीचे प्रमाण अधिक आहे. याचमुळे येथील लोक स्वतःची एक किडनी विकून गुजराण करत आहेत.
स्वतःचे पोट भरण्यासाठी येथील लोक स्वतःची एक किडनी केवळ 2 हजार रुपयांमध्ये विकतात. या गावात मानवी अवयवांची तस्करी मोठय़ा प्रमाणात होते. येथे अवयवांची तस्करी करणाऱया टोळय़ांचे हस्तक गावातील साध्याभोळय़ा लोकांना आमिषं दाखवून त्यांची किडनी मिळवत असल्याचे समोर आले आहे.
अवयवांचे तस्कर गावातील लोकांना किडनी काढून घेतल्यावर त्याच्या जागी दुसरी किडनी तयार होणार असल्याची थाप मारतात. गावातील भोळेभाबडे लोक त्यांच्या थापांना बळी पडतात आणि काही हजार रुपयांच्या आमिषापोटी स्वतःचे बहुमूल्य अवयव गमावून बसतात.
तसेही नेपाळ तसेच दक्षिण आशियाई देश अवयवतस्करांसाठी नंदनवन मानले जातात. या देशांमध्येच अवयवांच्या तस्करीचे प्रमाण प्रचंड आहे. यातही नेपाळ तसेच बांगलादेशमध्ये अवयवांच्या तस्करीचे प्रमाण अत्यंत अधिक आहे. गरीब लोकांना हेरून त्यांची दिशाभूल करून अवयव प्राप्त करून ते गरजू धनाढय़ांना पुरविणाऱया अनेक टोळय़ा भारतातही कार्यरत आहेत.