क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
मानवीर सिंग आणि रॉय कृष्णा यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या बळावर एटीके मोहन बागान संघाने ओडिशा एफसी संघाचा 4-1 गोलांनी पराभव करून आयएसएल फुटबॉल स्पर्धेत एकतर्फी विजयाची नोंद केली. काल हा सामना बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आला.
या विजयाने एटीके मोहन बागान संघाला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 15 सामन्यांतून 9 विजय, 3 बरोबरी आणि 3 पराभवाने 30 गुण झाले असून त्यांचे दुसरे स्थान कायम आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबई सिटी एफसीचे 33 गुण आहेत. पराभूत ओदिशा एफसीला स्पर्धेतील नववा पराभव स्वीकारावा लागला. केवळ एक विजय व पाच बरोबरीने त्यांचे 8 गुण कायम राहिले व त्यांचे शेवटचे स्थान कायम राहिले.
एटीके मोहन बागानचे पूर्णता कालच्या सामन्यावर वर्चस्व होते. मानवीर सिंग, मार्सेलिनो परेरा आणि रॉय कृष्णा या त्रिकुटाच्या आक्रमक खेळासमोर ओडिशा एफसीची बचावफळी पार कोलमोडली. गोलरक्षक अर्शदीप सिंगला तर नेहमीच दक्ष राहावे लागलले. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला एटीके मोहन बागानने गोल करून आघाडी घेतली. रॉय कृष्णाने दिलेल्या पासवर मानवीर सिंगने डाव्या पायाने जबरदस्त फटका हाणला आणि गोलरक्षक अर्शदीप सिंगला भेदले.
त्यानंतर एटीके मोहन बागानची आक्रमणांची मालिका चालूच राहिली. प्रथम रॉय कृष्णाचा फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेल्यानंतर लगेच दोन मिनिटांनी मानवीर सिंगच्या पासवर मार्सेलिनो परेराने गोल करण्याची सोपी संधी वाया घालविली. 23व्या मिनिटाला रॉय कृष्णा आणि झेवियर हर्नांडिसच्या चालीवर लॅनी रॉड्रिग्सचा गोल करण्याचा यत्न दिशाहीन ठरल्यानंतर ओडिशाने मध्यंतराच्या ठोक्याला गोल करून सामना पहिल्या सत्रात 1-1 असा बरोबरीत आणला. कप्तान कोल आलेक्सझांडरने एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यला भेदले व गोल केला.
दुसऱया सत्रात एटीके मोहन बागानने आणखी तीन गोल केले व विजय अधिक सोपा केला. प्रथम मानवीर सिंगने संघाचा आणि आपला वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर तीन मिनिटांच्या अंतराने एटीकेने दोन गोल केले. 83व्या मिनिटाला एटीके मोहन बागानला पेनल्टी मिळाली. प्रणय हलदरने मारलेला फटका कोल आलेक्सझांडरने ओडिशाच्या बॉक्समध्ये हाथाळल्याने रेफ्रीने दिलेल्या पेनल्टीवर रॉय कृष्णाने गोल करून संघाची आघाडी 3-1 अशी वाढविली. त्यानंतर लगेच रॉय कृष्णाने एटीके मोहन बागानचा चौथा गोल केला आणि विजय अधिक सोपा केला.