कुंदापूरच्या अश्वथम्मा यांचे कार्य कौतुकास्पद
प्रतिनिधी/ बेंगळूर
एका वृद्ध भिकारी महिलेने तब्बल 1 लाख रुपये गोळा करून उडुपी जिल्हय़ातील शालिग्राममधील गुरुनरसिंह मंदिरातील अन्नछत्रासाठी सदर रक्कम दान केली आहे. अश्वथम्मा असे या भिकारी महिलेचे नाव असून ती कुंदापूरच्या गंगोळीतील कांचीकोडी येथील रहिवासी आहे. मंदिरात येणाऱया-जाणाऱया भाविकांकडून पैसे गोळा करून अन्नछत्रासाठी त्यांनी आतापर्यंत विविध मंदिरांना 5 लाखाहून अधिक देणगी दिली आहे.
अश्वथम्मा ही भगवान अय्यप्पाची भक्त असून दरवषी कित्येक महिने अय्यप्पा मालाधारण करून त्या तपस्या करतात. अनेक ठिकाणी भिक्षा याचना करून ती विविध मंदिरांना देणगी देते. जगभरातून कोरोनाचे उच्चाटन व्हावे आणि सर्वांचे कल्याण व्हावे, अशी इच्छा अश्वथम्मा यांनी व्यक्त केली आहे. कोणीच उपाशी राहू नये, यासाठी त्या मंदिरांसमोर भिक्षा याचना करतात. गुरुनरसिंह मंदिर, पोलोली राजाराजेश्वरीसह इतर मंदिरांमध्ये त्यांनी स्वतः जमवलेली रक्कम दान केली आहे. दिवसभरात भिक्षा याचनेतून जमा झालेली रक्कम त्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा करतात. दरवषी शबरीमाला यात्रा करण्यापूर्वी जमा झालेली पूर्ण रक्कम त्या मंदिरांना दान करतात. शबरीमाला येथे रवाना होण्यापूर्वी त्या 9 फेब्रुवारी रोजी शालिग्राम येथील गुरुनरसिंह मंदिरातील धार्मिक विधीत सामील होणार आहेत. मंदिराचे पुजारी जनार्दन अडिगा यांनी त्यांचा गौरव केला.