अभिनेत्री जान्हवीने सोमवारी स्वत:चा वाढदिवस साजरा केला आहे. जान्हवीच्या या जन्मदिनी तिच्या चित्रपटातील तिचा लुक समोर आला आहे. अभिनेत्री जान्हवी आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत दिसून येणार आहे. जान्हवी ही एनटीआर 30 या चित्रपटात काम करत आहे. जान्हवीच्या जन्मदिनी एनटीआर30 च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर तिच्या चित्रपटातील भूमिकेची पुष्टी केली आहे. जान्हवीने देखील चित्रपटातील स्वत:चा लुक शेअर केला आहे.
जान्हवी या पोस्टरमध्ये एका सरोवराच्या काठावर बसली असल्याचे दिसून येते. स्वत:च्या पसंतीच्या कलाकारांसोबत जाण्याची प्रतीक्षा करू शकत नाही, अखेर हे घडत आहे असे जान्हवीने स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. एनटीआर30 चे चित्रिकरण 1 जानेवारीपासून सुरू झाले आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवीची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. जान्हवीने या चित्रपटासाठी 3.5 कोटी ऊपयांचे शुल्क घेतल्याचे समजते.
मागील 5 वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या जान्हवीसाठी हा चित्रपट म्हणजे मोठी संधी ठरणार आहे. जान्हवीने स्वत:चा पहिला हिंदी चित्रपट ‘धडक’साठी कथितपणे 60 लाख ऊपये घेतले होते. मागील काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये तिची स्थिती सुधारली आहे. जान्हवी सध्या बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक मानली जात आहे.