विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांचा निर्णय
अगरतळा / वृत्तसंस्था
त्रिपुरा राज्याचे पुढील मुख्यमंत्री माणिक साहा हेच असतील, असे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या त्रिपुरा राज्य विधिमंडळ पक्षाची बैठक राजधानी अगरतळा येथे झाली. त्यात साहा यांनाच आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. 8 मार्चला त्यांचा शपथविधी होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
आजपर्यंत ज्या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव झाला नव्हता, त्या मतदारसंघात या निवडणुकीत त्या पक्षाच्या उमेदवाराला हरविणाऱया केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक या मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र, अखेर माणिक साहा यांच्या नावावरच एकमत झाले आणि त्यांची निवडही झाली.
सलग दुसऱयांना बहुमत
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे परिणाम नुकतेच घोषित झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्रिपुरात सलग दुसऱयांदा स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळविले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या नेतृत्वातच भाजपने जिंकली होती. मात्र, नंतर मुख्यमंत्रीपदासाठी साहा आणि भैमिक यांच्या नावाची चर्चा होती.
मेघालय, नागालँडमध्ये आज शपथविधी
मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी कोनराड संगमा यांचा शपथविधी आज मंगळवारी होणार आहे. त्याचप्रमाणे नागालँडमध्येही आज नवे सरकार स्थानापन्न होणार आहे. या दोन्हीं शपथविधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती लाभणार आहे. या दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये भाजप हा सहयोगी पक्ष राहणार आहे.