प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार : जेफ बेजोस यांची ब्ल्यू ओरिजिन कंपनी सज्ज
वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
अनेक वर्षांपासून संशोधनात मग्न अमेझॉन प्रमुख जेफ बेजोस यांची वैयक्तिक कंपनी ब्ल्यू ओsरिजिन एप्रिलपासून स्वतःच्या पहिल्या प्रवाशाची अंतराळाची सैर घडवून आणण्यास सज्ज आहे. ब्ल्यू ओरिजिन स्वतःच्या न्यू शेपर्ड फ्यूचर स्पेस टूरिझम रॉकेटद्वारे प्रवाशांना अंतराळात नेण्यापासून काही पावलेच दूर आहे.
कंपनीने न्यू शेपर्डचे 14 व्यांदा यशस्वी परीक्षण केले आहे. या यशस्वी परीक्षणात नवे बूस्टर तसेच अद्ययावत कॅप्सूलची चाचणी करण्यात आली आहे. एनएस-14 मिशनमध्ये क्रू कॅप्सूलमध्ये अनेक यंत्रणांचा वापर करण्यात आला. यात अंतराळवीरांना मोहीम नियंत्रण कक्षासोबत संवाद साधण्यासाठी पूश-टू-टॉक सिस्टीम, प्रत्येक आसनावर एक नवी क्रू अलर्ट सिस्टीम आहे. याचबरोबर कॅप्सूलमधील गोंगाट कमी करण्यासाठी कुशन लायनिंग, वातानुकुलन यंत्रणा आणि आर्दता नियंत्रित करणारी यंत्रणा यात सामील आहे.
न्यू शेपर्ड एकप्रकारे पूर्णपणे स्वायत्त यंत्रणा आहे. या परीक्षणात प्रक्षेपकात पेलोड ठेवून उड्डाण करण्यात आले. कॅप्सूलने पृथ्वीवर परतण्यापूर्वी 10 मिनिटांचा कालावधी शून्य गुरुत्वाकर्षणात घालविला आहे. प्रक्षेपकाच्या वरील हिस्स्यात 6 अंतराळवीरांसाठी कॅप्सूल तयार करण्यात आले आहे. न्यू शेपर्डचे पुढील प्रक्षेपण 6 आठवडय़ांनी म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस होईल. याच्या 6 आठवडय़ांनी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये ब्ल्यू क्रूसोबत फ्लाइटला अंतराळात पाठविण्याचे ओरिजिनचे लक्ष्य आहे. पुढील परीक्षण एनएस-15 मध्ये क्रूच्या लोडिंग-अनलोडिंगसंबंधी असेल.
2000 साली स्थापना
जेफ बेजोस यांनी ब्लू ओरिजिन या अंतराळ कंपनीची स्थापना 2000 साली केली होती. जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनची ऍलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्ससोबत तीव्र प्रतिस्पर्धा आहे. मे 2020 मध्ये स्पेसएक्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत मानवाला पोहोचविणारी पहिली खासगी कंपनी ठरली आहे.