प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांमध्ये रविवार दि. 24 जानेवारी रोजी होणारी प्रथमश्रेणी साहाय्यक पदांची (एफडीए) स्पर्धा परीक्षा कर्नाटक लोकसेवा आयोगाने (केपीएससी) लांबणीवर टाकली आहे. बेंगळूर शहरात रविवारी होणाऱया परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आहे त्यामुळे केपीएससीच्या सचिव जी. सत्यवती यांनी परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केली. तसेच या परीक्षेची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
केपीएससीने मागील वर्षी 31 जानेवारी 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 2020 या सालातील रिक्त असणाऱया विविध खात्यातील प्रथमश्रेणी साहाय्यक पदांच्या नेमणुकीसाठी स्पर्धा परीक्षा नियोजित केली होती. त्यानुसार शनिवारी सक्तीची कन्नड परीक्षा आणि रविवारी स्पर्धा परीक्षा होणार होती. शनिवारची कन्नड परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, रविवार दि. 24 रोजी होणाऱया परीक्षेची प्रश्नपत्रिका शनिवारीच काही जणांच्या हाती लागली होती. याविषयी सत्यता पडताळल्यानंतर प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केपीएससीने शनिवारी रात्री पत्रक प्रसिद्ध करून परीक्षा लांबणीवर टाकण्यात येत असल्याची घोषणा केली.
याप्रकरणी बेंगळूरमध्ये केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी कारवाई करून राचप्पा, चंद्रु यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 24 लाख रुपयांची रोकड, 3 वाहने आणि प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली आहेत. सीसीबीचे प्रमुख संदीप पाटील यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. कारवाईनंतर जप्त केलेल्या प्रश्नपत्रिका पडताळणीसाठी केपीएससीकडे पाठविण्यात आल्या होत्या. सदर प्रश्नपत्रिका रविवारी होणाऱया परीक्षेच्याच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रथमश्रेणी साहाय्यक पदांची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय केपीएससीने घेतला.
तपासाला गती
स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांमधील परीक्षा केंद्रांवर तयारी करण्यात आली होती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा देणाऱया उमेदवारांची निराशा झाली आहे. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना कोठून प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या?, कोणीकोणी प्रश्नपत्रिका खरेदी केल्या?, इतर जिल्हय़ांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचल्या का?, याचा तपास सीसीबी पोलिसांकडून केला जात आहे.