क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव :
एफसी गोवाचे फॅन्स माझ्याकडून केवळ गोल्स आणि या खेळातील व्यावसायिकतीची अपेक्षा करत आहेत आणि मी ती पूर्ण करण्याचा निकराचा प्रयत्न करीन, असे संघाला एक वर्षाचा करार केलेला स्पेनचा आघाडीपटू इगोर अँगुला म्हणाला. एफसी गोवासाठी मी माझी मोहिम सुरू करण्यास उत्सुक असल्याचेही तो म्हणाला.
मी जेव्हा पोलंडमध्ये खेळत होतो, तेव्हा मला फुटबॉलप्रेमींचे चांगले प्रेम मिळाले व ते फक्त माझ्या गोल नोंदविण्याच्या क्षमतेसाठीच नव्हते तर फुटबॉल खेळात मी दाखविलेल्या माझ्या व्यावसायिकतेसाठी होते. मी स्वत:ला जबाबदार धरत आहे. मी माझ्या जबाबदाऱया सोडत नाही व त्या माझ्यासाठी महत्वपूर्ण आहेत, असे इगोर म्हणाला.
गोल करण्यात तरबेज असलेला स्पेनचा इगोर हा या मोसमात एफसी गोवाच्या आघाडीफळीत आक्रमणांचा केंद्रबिंदू ठरणार आहे. 2006 मध्ये इगोरने स्पेन सोडल्यानंतर फ्रान्समध्ये तो एएस कॅन्स या संघाला अल्पकाळासाठी खेळला. त्यानंतर 2016 साली पोलंडमधील गॉर्निक झॅब्राज या संघात तो रमला. या क्लबसाठी तो चार मोसम खेळला व प्रत्येक वेळा सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडूही ठरला. या क्लबसाठी खेळताना इगोरने 99 सामन्यांत 63 गोल केले.
बाहेरचे जीवन जगण्यासाठी आपल्या देशाबाहेर जाणे कधीही सोपे नाही. इगोर मात्र पुढाकार घेण्यास मागेपुढे पाहत नसे आणि यामुळे त्याला एफसी गोवाशी संबंध शोधण्यास मदत झाली आहे. एफसी गोवाचा खेळ मी पाहिला आहे. या संघाला नेहमीच आक्रमक खेळ करायला आवडतं, पुढाकार घ्यायला आवडतं. गेल्या काही वर्षांत मला भारतात खेळण्याची संधी होती. तथापि, मी योग्य संधीची वाट पाहत होता आणि माझ्यासाठी गोवा हा माझा फुटबॉलचा विकास कायम ठेवण्यासाठी सर्वोत्तम क्लब असल्याचे इगोर म्हणाला.
एफसी गोवाच्या एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेत इगोर हा त्याचा हुकमी खेळाडू आहे. मी एक अत्यंत स्पर्धात्मक खेळाडू आहे आणि मला आशिया खंडातील दर्जेदार क्लबविरूद्ध खेळायचंय आणि हे सुद्धा एफसी गोवा संघाला करारबद्ध होण्याचे मुख्य कारण असल्याचे इगोर म्हणाला. एफसी गोवासाठी माझ्या पहिल्या वर्षांत, मी आणि एफसी गोवा क्लबच्या चाहत्यांसाठी कित्येक क्षण आनंदात आणू, असे इगोर म्हणाला.