प्रतिनिधी/ गुहागर
कोकण एलएनजी प्रोजेक्टमध्ये ब्रेक वॉटर उभारणीचा ठेका घेतलेल्या एलएनटी कंपनीला तालुक्यातील शिवसेनेने कामामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी करत चांगलेच धारेवर धरले. यामुळे कंपनी व शिवसैनिकांमध्ये होत असलेल्या या वादाचा विषय अखेर तहसीलदारांच्या कोर्टात गेला. याप्रकरणी सोमवारी तहसीलदारांच्या दालनामध्ये कंपनी अधिकारी व शिवसैनिकांमध्ये आयोजित बैठकीला झालेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला.
तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी प्रकल्पामधील समुद्रामधील ब्रेक वॉटरचे काम करण्याचा ठेका एलएनटी कंपनीला मिळाला आहे. गेले दोन महिने एलएनटी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच उपठेकेदारांनीही येथे हजेरी लावली असून शृंगारतळी व गुहागर याठिकाणी वस्तीच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. तालुक्यात येणारी प्रत्येक कंपनी आपल्याबरोबर ठेकेदारही बाहेरून आणते. परिणामी गुहागरात काम असले तरी स्थानिकांना यामध्ये कोणतेच काम मिळत नाही. यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शिवसैनिक संघटीत झाले असून एलएनटी कंपनीने कामामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
याप्रकरणी एलएनटीच्या अधिकाऱयांना दोन ते तीनवेळा चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. यामुळे वारंवार उडणाऱया या खटक्यामुळे हा विषय तहसीलदार लता धोत्रे यांच्यापर्यंत पोहचला आहे. या वादाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी तहसीलदारांच्या दालनामध्ये एलएनटी कंपनीचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यांची बैठक लावण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर व शिवसेना पदाधिकाऱयांनी स्थानिकांना रोजगार देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कंपनीला आवश्यक असलेले काळे दगड ज्या ठिकाणातून काढले जाणार आहेत तेथून पवारसाखरी गावाची वस्ती जवळ आहे. यामुळे होणाऱया सुरूंग स्फोटामुळे स्थानिकांच्या घरांना धोका असल्याचाही विषय समोर आला.
तसेच एलएनटी कंपनीमध्ये उपठेकेदार म्हणून काम करणारी बालाजी ही ठेकेदार कंपनीही स्थानिकांना डावलून काम करत असल्याचे गाऱहाणे शिवसैनिकांनी तहसीलदारांसमोर मांडले. यावर तहसीलदारांनी कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये, जर तसे कृत्य झाले तर आम्हाला कारवाई करणे भाग पडेल, अशी समज उपस्थित शिवसैनिकांना दिली. तब्बल एक तासाच्या वर सुरू असलेल्या या बैठकीनंतर पुन्हा एलएनटी कंपनी अधिकाऱयांबरोबर बैठक लावण्यात येईल असे सांगून ही बैठक संपवण्यात आली.
प्रशासकीय आवारातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा या बैठकीला मोठय़ाप्रमाणात शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदारांचे दालन पूर्णपणे भरून दालनाबाहेरही मोठय़ाप्रमाणात गर्दी झाली होती. एकाबाजुला प्रशासन पंचायत समिती व नगरपंचायतींना वेबवरून मासिक बैठका घेण्याचे आदेश काढते, सार्वजनिक बैठका करू नयेत असा शासन आदेश निघतो, तर सोमवारच्या या बैठकीतील गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला. अशामध्ये दरवाजात व दालनामध्ये उभ्या असलेल्यांना बाहेर जाण्यास सांगितल्यावर त्यातील एकाने मी स्थानिक आहे, मी का बाहेर जाऊ, असे म्हणत वादही घातला. बैठक संपल्यावर पोलीस परेड मैदानावर शिवसेना पदाधिकारी व त्या वाद घालणाऱया व्यक्तीची चांगलीच जुंपल्याचे चित्र पहावयास मिळाले.