वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
डीन एल्गारच्या समयोचित शानदार शतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 145 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दुसऱया दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी लंकेने दुसऱया डावात 1 बाद 50 धावा जमविल्या होत्या.
या कसोटीच्या पहिल्या दिवशी लंकेचा पहिला डाव 157 धावांवर आटोपला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 148 धावापर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येवरून दक्षिण आफ्रिकेने सोमवारी दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. डीन एल्गार आणि डय़ुसेन यांनी दुसऱया गडय़ासाठी 184 धावांची भागिदारी केली. चमाराने एल्गारला झेलबाद केले. त्याने 22 चौकारांसह 163 चेंडूत 127 धावा झळकविल्या. एल्गार बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे उर्वरित आठ फलंदाज 84 धावांत तंबूत परतले. डय़ुसेनने 127 चेंडूत 12 चौकारांसह 67 धावा जमविल्या. कर्णधार डि कॉकने 1 चौकारांसह 10, बेहुमाने 3 चौकारांसह 19, नॉर्त्जेने 2 चौकारांसह 13, एन्गिडीने 3 चौकारांसह नाबाद 14 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 75.4 षटकांत 302 धावांवर आटोपला. लंकेतर्फे विश्वा फर्नांडो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 101 धावांत 5 तर ए. फर्नांडो आणि शनाका यांनी प्रत्येकी 2 आणि चमाराने एक गडी बाद केला.
पिछाडीवर असलेल्या लंकेने आपल्या दुसऱया डावाला सुरूवात केली. पण डावातील तिसऱया षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या एन्गिडीने कुशल परेराला केवळ एका धावेवर त्रिफळाचीत केले. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी लंकेने दुसऱया डावात 15.4 षटकांत 1 बाद 50 धावापर्यंत मजल मारली होती. कर्णधार करूणारत्ने 31 तर थिरिमने 4 चौकारांसह 17 धावांवर खेळत होते. या जोडीने अभेद्य 49 धावांची भागिदारी केली होती. दक्षिण आफ्रिकेतर्फे एन्गिडीने 10 धावांत 1 गडी बाद केला. लंकेचा संघ अद्याप 95 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव- सर्वबाद 157, दक्षिण आफ्रिका प. डाव-75.4 षटकांत सर्वबाद 302 (एल्गार 127, डय़ुसेन 67, मार्करम 5, डु प्लेसिस 8, डी कॉक 10, बेहुमा 19, मुल्डर 7, केशव महाराज 2, नॉर्त्जे 13, एन्गिडी नाबाद 14, विश्वा फर्नांडो 5-101, ए. फर्नांडो 2-61, शनाका 2-42, चमारा 1-53), लंका दु. डाव- 15.4 षटकांत 1 बाद 50 (करूणारत्ने खेळत आहे 31, थिरिमने खेळत आहे 17, कुशल परेरा 1, एन्गिडी 1-10).