उत्तराखंड-चमोली येथील भीषण दुर्घटना
देहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता एक एसयुव्ही कार 700 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले. मृतांमध्ये 10 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. वाहन नेण्याची अनुमती नसलेल्या भागात काही पर्यटक एसयुव्ही कारसह गेल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. अपघातावेळी एसयुव्ही कारमध्ये 21 लोक होते. त्यापैकी टेरेसवर 2-3 लोक बसले होते, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. एसयुव्ही उत्तराखंडमधील जोशीमठ येथून पल्ला जाखुला गावाकडे जात असताना अपघाताची भीषण दुर्घटना घडली. एसयुव्ही पल्ला गावाजवळील एका टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करत होती. याचदरम्यान चालकाचे नियंत्रण सुटून एसयुव्ही दरीत कोसळली. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी रस्ता कच्चा आणि खडीमय होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघात झालेल्या उरगम-पल्ला जाखोला या 11 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम 2020 पासून सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्णत्वास न केल्याने या मार्गावर पर्यटक वाहनांना अनुमती दिली जात नाही. अपघातापूर्वी एसयुव्ही चेकपोस्टवरून गेली होती, मात्र इथे कोणीही अडवले नसल्याचे स्पष्ट झाले आहे