क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेली एससी ईस्ट बंगाल व केरळ ब्लास्टर्स यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. या नाकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. केरळ ब्लास्टर्सचे आता पाच सामन्यांतून 6 गुण झाले असून ते सातव्या स्थानावर तर एससी ईस्ट बंगालचे सहा सामन्यांतून 3 गुण असून ते अकराव्या स्थानावर आहेत.
आक्रमण आणि बचाव यांच्यातील चढाओढ कालच्या लढतीत पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात टॉमिस्लॅव्ह मार्सेला आणि अल्वहारो व्हॅजकज यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी मिळविली होती. त्यामुळे आघाडी घेण्याच्या शर्यतीत दुसऱया सत्रात दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. या बरोबरीमुळे एसी ईस्ट बंगालची विजयाची पाटी कोरीच राहिली. केरळ ब्लास्टर्सच्या ऍड्रियान लूनाने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, मात्र ईस्ट बंगालचा बचावही तितकाच ताकदीचा होता.
सामन्याच्या 37व्या मिनिटाला एससी ईस्टबंगालने गोलचे खाते उघडले. राजू गायकवाडच्या थ्रो-इनवर टॉमिस्लॅव्ह मार्सेलाने हेडरवर गोल करून ईस्ट बंगालचे खाते उघडले. त्यापूर्वी 25व्या मिनिटाला अँटोनियो पेरोसेव्हिचने मारलेला चेंडू गोलपोस्टला आदळून माघारी आला होता. 44व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने बरोबरी साधली. 15व्या मिनिटाला अल्वहारो व्हॅजकजचा गोल रेफ्रीने अवैद्य घोषित केला होता. त्यानेच अप्रतिम गोल करताना सामना 1-1 असा बरोबरीत आणला.