क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील रोमहर्षक लढतीत वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने पणजी फुटबॉलर्स संघाचा 4-2 गोलानी पराभव केला. जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यत आलेल्या या सामन्यातील विजयाने वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबला 3 गुण प्राप्त झाले.
रॉनील आझवेदो व जेम्स फर्नांडिसने वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबसाठी प्रत्येकी दोन तर आकाश सनदी आणि जॅनियो फर्नांडिसने पणजी फुटबॉलर्ससाठी प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या आठव्याच मिनिटाला पणजी फुटबॉलर्सने आघाडी घेतली. आकाश सनदीने प्रतिस्पर्धी गोलरक्षक जीत गुप्ताला भेदून हा गोल केला. त्यानंतरच दुसऱयाच मिनिटाला पणजी फुटबॉलर्सच्या बचावफळीतील चुकीचा फायदा घेत रॉनील आझावेदोने वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबचा बरोबरीचा गोल केला. वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने परत 16व्या मिनिटाला आघाडी घेताना चॅडल फर्नांडिसच्या क्रॉसवर ताबा मिळवित जेम्स फर्नांडिसने गोल केला. त्यानंतर जेम्सने वेळसावच्या तिसऱया गोलाची नोंद केली व आघाडी 3-1 अशी वाढविली. दुसऱया सत्रात पणजी फुटबॉलर्सच्या जॅनियो फर्नांडिसने गोल करून सामना 3-2 असा आणला तर जादा वेळीतील खेळात रॉनील आझावेदोने प्रतिस्पर्धी दोन बचावपटूंना व नंतर गोलरक्षकाला भेदून वेळसावचा चौथा गोल केला.