जिल्हा रुग्णालयासह सावंतवाडी, कणकवली उपजिल्हा रुग्णालयांत मोहीम : पहिल्या दिवशी 300 पैकी 165 जणांनी घेतला लाभ
- जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात मोहिमेचा प्रारंभ
- सिंधुदुर्गात पहिली कोरोना लस घेण्याचा मान अलका सागवेकर यांना
- कणकवलीत राणे, तर सावंतवाडीत डॉ. वसेकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ
लसीकरणामुळे कुणालाही त्रास ला नसल्याचेही स्पष्ट
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
उत्सुकता लागून राहिलेल्या ऐतिहासिक कोरोना लसीकरण मोहिमेला अखेर शनिवारपासून प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते जिल्हय़ाच्या कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्गात कोरोना लस घेणाऱया पहिल्या लाभार्थी जिल्हा रुग्णालयाच्या स्टाफ नर्स अलका विठोबा सागवेकर या ठरल्या. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार नीतेश राणे, तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
लसीकरण मोहीम प्रारंभावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आरोग्य विभागाच्या कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांद्रेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, डॉ. संदेश कांबळे, आरोग्य सेविका शुभलक्ष्मी सूर्यवंशी, व्हॅक्सिनेशन ऑफिसर राजेश पारधी, महेश जोगदंड तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य परिचारिका उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱयांकडून लाभार्थींचे अभिनंदन
यावेळी जिल्हाधिकाऱयांनी लाभार्थींचे अभिनंदन केले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील सर्वच आरोग्य कर्मचाऱयांना लस देता येणार आहे. लसीकरणासाठीच्या तयारीसाठी आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचेही जिल्हाधिकाऱयांनी अभिनंदन केले.
प्रतीक्षा कक्षात लाभार्थींची नोंदणी
लसीकरणावेळी सुरुवातीस लाभार्थ्यांकडून त्यांचे छायाचित्र असलेले कोणतेही एक ओळखपत्र घेण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षामध्ये बसविण्यात आले. प्रतीक्षा कक्षात त्यांची नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर लाभार्थींना लस देण्यात आली. लस देतेवेळी लसीकरण करणाऱया डॉक्टर व नर्सनी त्यांचे लसीविषयी समुपदेशन केले. नंतर त्यांना अर्ध्या तासासाठी निरीक्षण कक्षामध्ये थांबविण्यात आले. यावेळी केंद्रावरील दुसऱया लाभार्थी अमिता हरकुळकर यांनाही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लस देण्यात आली.
दोन डोसमध्ये चार ते सहा आठवडय़ांचे अंतर
जिल्हय़ासाठी सिरम इन्स्टिटय़ूट निर्मित कोव्हिशिल्डची 10 हजार 260 लस उपलब्ध आहे. तसेच लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्शनसाठी 12 हजार 600 सिरिंज मिळाल्या आहेत. ही लस दोन ते आठ सेंटिग्रेड तापमानात साठविली जाते. एक व्हायल 5 मि. ली. ची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मि. ली. एवढा डोस देण्यात येत आहे. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. दोन डोसमध्ये चार ते सहा आठवडय़ांचे अंतर असणार आहे.
लसीकरण प्रक्रियेत एकूण सोळा सत्रे
जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली आहे. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी चार व्हॅक्सिनेशन ऑफिसर, दोन व्हॅक्सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.
नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण
आरोग्य विभागामार्फत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांची तीनही लसीकरण केंद्रांवरील 300 जणांची यादी तयार होऊन आल्यानंतर लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते. हे लाभार्थीं लसीकरणासाठी आल्यानंतर त्यांची पुन्हा नोंदणी कक्षामध्ये नेंदणी होऊन ओळखपत्र दाखविल्यानंतरच लसीकरण कक्षामध्येच पाठविले जात होते. त्यानंतर लस दिल्यावर त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवर लस यशस्वीपणे दिल्याचा मेसेजही येत होता.
300 पैकी 165 जणांचे (55 टक्के) लसीकरण
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 300 पैकी 165 जणांनी लस घेतली. 55 टक्के लसीकरण झाले. शनिवारी झालेल्या लसीकरणामध्ये कुणालाही त्रास झाला नाही. लसीकरण सुरळीत पार पडल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. जिल्हय़ात तीन लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 जणांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयामध्ये 47 जणांनी लस घेतली, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 85 जणांनी, तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 33 जणांनी लस घेतली आहे. कोरोना लसीकरणाचा पहिलाच दिवस आहे आणि लस देण्यात येणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांची यादी रात्री दोन वाजता प्राप्त झाली होती. त्यामुळे काही कर्मचाऱयांशी संपर्क होऊ शकला नाही, तर काही कर्मचारी वैयक्तिक अडचणींमुळे येऊ शकले नाहीत. मात्र त्यांना पुन्हा लस घेण्याची संधी अजून आहे. फार कमी लोकांनी लस घेण्यास नकार दिला आहे. मंगळवारपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
ऍलर्जी असल्यानेच लस घेण्यास काहींचा नकार
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी लस देण्यात येणाऱया लाभार्थ्यांची 300 जणांची यादी निश्चित करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते. परंतु, काही लाभार्थ्यांनी लस घेण्यास नकार दिला. त्यांची प्रतिक्रिया घेतली असता, आपल्याला औषधांची ऍलर्जी आहे. त्यामुळे आपण लस घेण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. तर काहींच्या मनामध्ये अजूनही थोडेफार भीतीचे वातावरण असल्यामुळे त्यांनी लस घेण्यास नकार दिला. मात्र लस नाकारण्याचे नमके कारण सांगणे टाळले.
सर्वांनी लस घ्यावी – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी कोरोना विरुद्धची लढाई गेले वर्षभर लढत आहोत. आता कोरोनावरील लस आली, ही आनंदाची गोष्ट आहे. कोरोनाच्या या लढाईमध्ये जिल्हय़ातील सर्व आरोग्य कर्मचाऱयांनी कोरोना वॉरियर्स म्हणून चांगले काम केले आहे. लसीकरण मोहिमेच्या तयारीमध्येही जिल्हा आरोग्य अधिकारी व कर्मचारी, जिल्हा रुग्णालयीन कर्मचारी या सर्वांनी चांगले काम केले आहे. आता कोणतीही भीती न बाळगता सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांनी लस घ्यावी व मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
गंभीर आजार टाळण्यासाठी लस घ्या – डॉ. महेश खलिपे
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेले वर्षभर दिवस-रात्र आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनामुळे 164 जणांचा मृत्यू झाला आहे. यापुढे तरी मृत्यू होऊ नयेत, गंभीर आजाराने मृत्यू टाळावेत, यासाठी प्रत्येकाने ही लस घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले. कोरोनाचा सर्वात धोका असतो तो आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांना. त्यामुळे त्यांनी लस घेतल्यास स्वत:बरोबरच त्यांच्या संपर्कातील त्यांची कुटुंबे आणि समाजाला वाचविण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
(अलका सागवेकर ‘16ओरोस8’ यांच्या फोटोसह बॉक्स घेणे.)
अलका सागवेकर
यंत्रणेवरील विश्वासामुळेच लस घेतली – अलका सागवेकर
कोरोनाविरुद्ध आम्ही वर्षभर लढत आहोत. रुग्णांना सेवाही देत आहोत. आता प्रत्यक्षात कोरोनाची लस आल्यावर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांनाच प्राधान्याने लस दिली जात आहे, ही आमच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. पहिलीच लस आम्हाला दिली जात असल्याने सुरुवातीला मनामध्ये थोडी भीती होती. परंतु, लस बनवणाऱया अनुभवी संस्थेवर आणि लस देणाऱया आमच्या आरोग्य यंत्रणेवर आपला 100 टक्के विश्वास असल्यानेच मनातील भीती काढून टाकली आणि लस घेण्यास तयारी दर्शविली. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला, हा देखील आनंद असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हय़ात जिल्हा रुग्णालय येथे कोरोना लस प्रथम घेणाऱया जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका विठोबा सागवेकर यांनी व्यक्त केली. तसेच लस घेतल्यानंतर निरिक्षणाखाली असताना अलका सागवेकर म्हणाल्या, कोरोना लस घेतल्याचे आपल्याला खूप समाधान वाटत असून कोणताही त्रास जाणवत नाही.