उच्च न्यायालयाची सरकारला सक्त ताकीद : ऑक्सिजनशी संबंधित प्रत्येकाची घेतली झाडाझडती
प्रतिनिधी / पणजी
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात ऑक्सिजनचा प्रचंड तुडवडा असल्यामुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची कबुली गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी बुधवारी उच्च न्ययालयासमोर दिली आणि एका दृष्टीने गोमेकॉतील गलथानपणा मान्य केला. “आजपासून यापुढे ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावता कामा नये’’, अशी ताकीद न्या. महेश सोनक आणि न्या. नितीन सांब्रे या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिली असून या प्रश्नावरील सुनावणी परत आज गुरुवार दि. 13 मे रोजी होणार आहे.
काल बुधवारी ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली तेव्हा राज्याचे आरोग्य सचिव रवी धवन, प्रिन्सीपल वित्त सचिव पुनित कुमार गोयल, नगरविकास सचिव डॉ. तारिक थॉमस, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोडल ऑफिसर डॉ. विराज खांडेपारकर उपस्थित होते. डीन डॉ. शिवानंद बांदेकर अनुपस्थितीत असल्याचे आढळताच न्यापीठाने चौकशी केली आणि तात्काळ त्यांच्या उपस्थितीचा आदेश दिला. सरकारच्या वतीने ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्यासोबत अतिरिक्त सरकारी वकील दीप शिरोडकर उपस्थित होते. गोमेकॉला ऑक्सिजन पुरवठा करणाऱया मेसर्स स्कूप इंडस्ट्रिज प्रा. लि. या आस्थापनाच्या वतीने ऍड. विवेक रॉड्रिग्स तर केंद्र सरकारच्या वतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रविण फळदेसाई आणि रविराज चोडणकर उपस्थित होते.
नव्या याचिका सादर
मुंबई उच्च न्यायालयासमोर बुधवारी कोविड संदर्भात नव्या याचिका सादर झाल्या. कोविड सर्व्हिसीस गोवा या संस्थेच्या वतीने दिशा नायक सरदेसाई व सिद्धार्थ सरदेसाई यांनी याचिका सादर केली. त्यांच्यावतीने ऍड. अमित पालेकर यांनी काम पाहिले. ऍड. पालेकर यांनी वेगळी स्वतंत्र जनहित याचिका न्यायपीठासमोर सादर केल्याचे स्पष्ट केले.
दक्षिण गोवा वकील संघटनेच्या वतीने ऍड. निखील पै यांनी बाजू मांडली. आर्मांडो गोन्साल्वीस यांनी सादर केलेल्या याचिकेवर ऍड. आकाश रिबेलो, ऍड. सई गोमीश परेरा व ऍड. वरुण बांदेकर बाजू मांडण्यास उपस्थित होते. रोशन माथियाज यांनी सादर केलेल्या याचिकेवर ऍड. नायजेल दा कॉस्ता प्रेईश यांनी बाजू मांडली तर ऍड. विशाल सावंत, ऍड. जी मळीक यांनी त्यांना सहाय्य केले.
ऑक्सिजन हवा 55 मेट्रिक टन, पण मिळत नाही
संपूर्ण गोव्यातील इस्पितळांसाठी रोज सुमारे 55 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा लागतो. गोमेकॉत सर्वात अधिक मागणी आहे, पण तेवढा पुरवठा होत नाही याची कबुली डॉक्टर आणि उपस्थित अधिकाऱयांनी न्यायपीठापुढे दिली.
गोमेकॉला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा नाही
सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी 20 हजार लिटर ऑक्सिजन पुरवठा करणारी टाकी आहे. पण त्यातून गोमेकॉच्या इस्पितळाला ऑक्सिजन पुरवठा करता येत नाही. गोमेकॉसाठी दिवसाला 72 ट्रॉली ऑक्सिजन सिलिंडर लागतात. पण तेवढा पुरवठा होत नसल्याने 1.5 क्युबिक मिटर व 7 क्युबिक मिटरचे सिलिंडर वापरले जातात. पण हा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची माहिती उच्च न्यायालयासमोर उघड करण्यात आली.
गोमेकॉत 700 खाटी, 950 रुग्ण
गोमेकॉ इस्पितळात 700 खाटी असून रोज 950 कोविड रुग्ण भरती होतात. सेंट्रल सिस्टमद्वारे ऑक्सिजन पुरवठा करणाऱया खाटी कमी आहेत. रोज दुपारी 2 वाजेपर्यंत 500 जंबो सिलिंडर लागतात. रात्री 10 वा. पर्यंत आणखी 250 जंबो सिलिंडर लागतात आणि परत पहाटे 6 वा. पर्यंत 250 जंबो सिलिंडर लागतात. या 1 हजार जंबो सिलिंडराव्यतिरिक्त 72 ट्रॉली लागतात. ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो, मात्र रिकामी सिलिंडर उपलब्ध नसल्याचे न्यायपिठासमोर स्पष्ट करण्यात आले.
रोज 50 पेक्षा अधिक रुग्ण का मरतात?
जे रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत व ज्यांना वेन्टीलेटर मिळाले नाहीत, त्यांना हाय फ्लो नेझल ऑक्सिजन एचएफएनओ उपकरणाद्वारे ऑक्सिजन दिले जाऊ शकते. अशी शेकडो यंत्रे गोमेकॉत पडून आहेत. ही यंत्रे खूप ऑक्सिजन वापरतात म्हणून त्याचा वापर केला जात नाही, अशी कबुली गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यावर रोज 50 पेक्षा रुग्ण का मरण पावतात हे स्पष्ट झाले.
रोज होतोय 400 सिलिंडरचा तुटवडा
रोज गोमेकॉत 1 हजार पेक्षा जास्त सिलिंडर लागत असले तरी किमान 400 सिलिंडरचा तुटवडा भासतो, अशी माहिती उघड होताच रिकामी सिलिंडर नसल्यामुळे व सिलिंडर नेण्यासाठी वाहने नसल्यामुळे अडथळा होतो, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी एनजीओ मार्फत गोव्याबाहेरून रिकामी ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची तयारी दर्शविली. तेव्हा रिकामी सिलिंडर आले तरी ते भरण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन साठा नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
मेसर्स स्कूपने दिले आश्वासन
गोमेकॉत रोज 72 ट्रॉली ऑक्सिजनची गरज असताना तेवढा पुरवठा होत नाही, यावर उच्च न्यायालयाने जाब विचारला तेव्हा रोज किमान 55 ट्रॉली व 600 जंबो सिलिंडर देण्याचे आश्वासन स्कूप कंपनीने दिले.
डीन विरुद्ध आरोग्य सचिव
आरोग्य सचिवांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि गोमेकॉच्या डीन ने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असलेली तफावत उच्च न्यायालयात उघड झाली. तेव्हा गोमेकॉ इस्पितळात प्रत्यक्ष पहाणी डीनच्या मार्गदर्शनाखाली होते, त्यामुळे डीननी उघड केलेली माहिती गृहित धरली जाईल, असे न्यायपीठाने स्पष्ट केले.
रवी धवन यांची केली स्तुती
गोमेकॉला ऑक्सिजन पुरवठा करण्यास आलेले अपयश त्यातल्यात्यात प्रशासक आणि डीन यांच्यातील मतभेद, ब्लेमगेम, हा खेळ चालू होता. खंडपीठ भडकलेच होते. अशावेळी आरोग्य सचिव रवी धवन सरकारी वकिलांचा आधार न घेता थेट न्यायपीठाशी बोलले व ही सुनावणी चालू असताना आपण दुसऱया बाजूने मेसर्स स्कूप कंपनीच्या अधिकाऱयांवर दबाव आणून चार डुरा सिलिंडरची व्यवस्था केली आहे. त्यातील 2 सिलिंडर गोमेकॉत पोहचलेसुद्धा अशी माहिती दिली. एका डुरा सिलिंडर मध्ये 28 जंबो सिलिंडर सामावतात, अशी माहिती त्यांनी दिली. तात्काळ व्यवस्था करण्यास तत्पर असल्याचे आढळल्याने उच्च न्यायालयाने त्यांच्या कार्याची स्तुती केली.
यापुढे मृत्यू होता कामा नये, मृत्यूचे तांडवा थांबवा
भारतीय संविधानाच्या 21 व्या परिशिष्टाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार हा मुलभूत अधिकार असून तिथे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे आम्ही असहाय्य असून पुरवठा ठीक होत नाही, साधन सुविधा नाहीत, हे यापुढे ऐकून घेतले जाणार नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे यापुढे मृत्यू होता कामा नये, मृत्यूचे हे तांडव ताबडतोब थांबवा, असे न्यायपीठाने बजावले आहे.
जबाबदारी ढकलण्याचा ब्लेम गेम नको, सहन करणार नाही
ऑक्सिजन पुरवठा करण्यास कमी पडत असल्यामुळे रुग्ण दगावतात हे मान्य करूनही एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा ब्लेम गेम खेळ चालू असून तो सहन केला जाणार नाही. यापुढे ऑक्सिजन कमी पडणार नाही याची हमी द्या आणि आजपासून यापुढे ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे रुग्ण दगावणार नाहीत याची काळजी घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांत दोन चालक, एका वाहकाला सूट
गोव्यात प्रवेश करणाऱया प्रत्येकाकडे कोविड नेगेटिव्ह प्रमाणपत्र असणे आवश्यक असून जीवनावश्यक वस्तू, ऑक्सिजन, दूध, औषधे घेऊन येणाऱया मालवाहू वाहनातील दोन चालक आणि एका वाहकाला त्यातून सूट देण्याचा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिला.
ऑक्सिजनअभावी रुग्ण असे पडले मृत्यूमुखी
उच्च न्यायालयाने आकडेवारी मागितली तेव्हा गेल्या तीन दिवसात गोमेकॉत ऑक्सिजनचा प्रचंड तुडवडा होता, हे उघड झाले. उच्च न्यायालयाने ही आकडेवारी आपल्या निवाडय़ात नमूद केली आहे. दि. 9 मे रोजी गोमेकॉत 500 जंबो सिलिंडर कमी पडले, त्या दिवशी 33 जणांचा मृत्यू झाला. दि. 10 मे रोजी 700 सिलिंडर कमी पडले, त्या दिवशी 25 जणांचा मृत्यू झाला. 11 मे रोजी 900 सिलिंडर कमी पडले, त्यादिवशी 45 जणांचा मृत्यू झाला. सध्या 1 हजार 140 सिलिंडरची आवश्यकता आहे. पण पुरवठा नाही. आम्ही काहीच करू शकत नाही, असे हतबल होऊन उत्तर दिले जाते. काहीही करा, पण ऑक्सिजन पुरवठा कमी पडू देऊ नका. आजपासून यापुढे ऑक्सिजन नसल्यामुळे एकही मृत्यू होता कामा नये, याची खबरदारी घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.