प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांच्या माध्यमातून जिल्हय़ासाठी ऑक्सिजन कॉन्सन्टेशन उपकरणे प्राप्त झाली आहेत. या उपकरणांचे लोकार्पण खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पणप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संजय पडते, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाला चार ऑक्सिजन कॉन्सन्टेशन उपकरणे प्राप्त झाली आहेत. या एका उपकरणाचे 65 हजार इतके मूल्य आहे. ऑक्सिजन कॉन्सन्टेशन उपकरणामुळे प्राथमिक स्टेजला असलेल्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यता भासल्यास याचा उपयोग करता येऊ शकतो. नैसर्गिक हवेचे शुध्दीकरण करून ऑक्सिजन रुग्णास पुरविण्यास मदत होते. यासाठी वेगळय़ा ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे हे उपकरण फायदेशीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणीही यावेळी खासदार राऊत व आमदार नाईक यांनी केली. त्याबरोबरच जिल्हा रुग्णालयातील ‘आयुष’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावाही घेण्यात आला. जिल्हय़ात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना खासदार राऊत यांनी यावेळी केल्या.