पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक झाल्याची प्रकरणे वाढत आहेत. ती रोखण्यासाठी फसवणूक झालेल्यांनी तातडीने सायबर क्राईम ब्रॅंचकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.
बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे म्हणाले, गेल्या दोन वर्षात बेळगाव पोलिसात ऑनलाईन फसवणुकीची 47 प्रकरणे दाखल झाली आहेत. ओटीपी, ओएलक्स, फेसबुक, तिकीट बुकिंग, मॅट्रिमोनिअल साईट अशा माध्यमातून फसवणूक झाल्याची 19 प्रकरणे उघडकीस आली होती. यात ऑनलाईन ट्रान्स्फरच्या माध्यमातून 65 लाख रूपयांवर डल्ला मारण्यात आला होता. तपासानंतर त्यापैकी 30 लाख रूपये परत मिळवण्यात यश मिळाले आहे. बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ऑनलाईन फसवणुकीला पायबंद घालण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहेत. अशी फसवणुक झाल्याच्या एक तासाच्या आत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यास गेलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे तातडीने तक्रार नोंदविणे गरजेचे आहे असे डॉ. आमटे म्हणाले.
बेळगाव महिला पोलिस ठाण्याच्या हद्दीत मानव तस्करी रोखण्यासाठी मोहीम राबवून 5 मुलांची आणि 8 महिलांची सुटका करण्यात आली आहे. अशा प्रकरणांची माहिती मिळाल्यास ती पोलिसांनी कळवावी असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले.