प्रतिनिधी / सातारा :
पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा, घरगुती गॅस दरवाढ रद्द करा, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी मोदींनी पेट्रोल दराची सेंच्युरी केल्याबद्दल क्रिकेटर आणि पेट्रोल पंपाची प्रतिकृती करत त्यांचाही निषेध नोंदवण्यात आला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस सचिन बेलागडे, गोरखनाथ नलावडे, प्रदेश निरीक्षक विद्यार्थी अतुल शिंदे, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सचिटणीस संगीता साळुंखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात जी जुलमी गॅस दरवाढ केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सहा वर्षापूर्वी केंद्र शासनाने जी आश्वासने दिली, डिझेल, पेट्रोल, गॅस असेल आठ वर्षांपूर्वी काय दर होते. त्यावेळी आघाडी सरकार होते. आता दर काय आहेत. आज राजकीय परिस्थिती पाहिली तर हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. सामान्य माणसाचे जगणे मुश्किल बनले आहे. जुलमी गॅसवाढ, डिझेलवाढ मागे घेतली पाहिजे यासाठी आमचे आंदोलन आहे.
संगीता साळूंखे म्हणाल्या, संपूर्ण देशाचे कंबरडे मोदी सरकारने मोडले आहे. स्मृतीताई इराणी कॉग्रेसच्या काळात एखादा रुपया दरवाढ झाली तर आकांडतांडव करत होत्या. आता त्या कोणत्या चुलीवर जेवण करतात. त्याचा फोटो मिळाला तरी त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. जेवण कसे बनवतात ते दाखवून द्या.काय परिस्थितीमध्ये तुम्ही जगता आहात आणि आम्हाला जगवता आहात.