शिक्षक, पालक व उमेद फौंऊंडेशनचा पुढाकार
प्रतिनिधी / प्रा.एस.पी.चौगले, वाकरे
हातावरचे पोट… घरात अठराविश्व दारिद्र्य.. आईचे आजारपण.. दोन सख्ख्या बहिणी १०वीमध्ये शिकणाऱ्या.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा ॲण्ड्राईड मोबाईल घेण्याची ऐपत नाही….अशा परिस्थितीत शाळेतील शिक्षक, दानशूर व्यक्ती व उमेद फौंऊंडेशनने पुढाकार घेत या मुलींना ॲण्ड्राईड मोबाईल व शालेय साहित्य उपलब्ध करून देऊन मानवतेचा वसा जपला.
कोपार्डे (ता.करवीर) येथील श्रीराम हायस्कूल भागशाळा कोपार्डे या प्रशालेत इयत्ता १०वीमध्ये मधुरा राऊ माने व रेश्मा राऊ माने या सख्ख्या बहिणी शिक्षण घेत आहेत.त्यांचे वडील गावात केस कर्तनालय चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. ऑनलाईन अध्ययनातल्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शाळेने पालक मिटींग बोलावली होती. या मिटींगमध्ये या मुलींच्या मातेने मोबाईल नसल्याने आपल्या मुलींचे शिक्षण बंद असून आणखी किती दिवस शिक्षणापासून दूर राहावे लागणार? असा सवाल करत आपली खंत व्यक्त केली.
यावेळी या विद्यार्थिनींना मदत करण्याचा शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालकांनी काही रक्कम तात्काळ जमा केली. याचवेळी शिक्षक नवीनचंद्र सणगर यांनी उमेद फौंऊंडेशनमार्फत या दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत शालेय साहित्य उपलब्ध करून दिले. मोबाईल नसल्याने मुलींचे शिक्षण बंद असल्याची बातमी समजताच शाळेचे माजी विद्यार्थी निलेश पाटील (योगिराज मोबाईल) यांनी ताबडतोब चांगल्या कंपनीचा मोबाईल उपलब्ध करून मदतीचा हात दिला. पालकांनी जमा केलेली रक्कम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना पालकांनी जमा केलेली रक्कम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वापरण्यात येणार आहे.
गेले चार- पाच महिने शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब असलेल्या मुलींच्या हातात मोबाईल व शैक्षणिक साहित्य पाहून या मुलींच्या मातेला गहिवरून आले. यानिमित्ताने समाजातील माणूसकीचा ओलावा अजूनही कायम असल्याचे चित्र पहावयास मिळाले. याकामी संस्थेचे सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव जयंत आसगावकर यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रभारी प्राचार्य ए. के. भगाटे, आर. एस्. जाधव, व्ही. आर्. पाटील, एच. एस.देवाळकर, बी. एस. रामाणे, एस. पी. पाटील, के.सी. कोरवी आदींचे सहकार्य लाभले.