वृत्तसंस्था/ टोकियो
पश्चिम जपानमधील एका शहराने टोकियो ऑलिम्पिक टॉर्च रिले कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. टॉर्च रिले रद्द करणारे हे दुसरे शहर आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास शंभर दिवसांचा अवधी असताना हा निर्णय घेण्यात आला असून स्पर्धा ठरल्याप्रमाणे होणार का, याबाबत आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. जपानसह अन्य देशांतही कोरोनाचा प्रकोप वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. ‘मात्सुयामा शहरातील टॉर्च रिले आम्ही रद्द करीत आहोत. मात्र टॉर्च शहरात आल्यानंतर आम्ही माफक प्रमाणात त्याचे सिलेबेशन करणार आहोत, पण त्यात प्रेक्षकांचा सहभाग असणार नाही,’ असे एहिमे प्रीफेक्चरचे टोकिहिरो नाकामुरा यांनी स्पष्ट केले. आपला हा निर्णय ऑलिम्पिक आयोजन समितीने स्वीकारला असल्याचेही त्यांनी सांगितले. फुकुशिमा येथे 25 मार्चपासून सुरू झालेल्या रिलेतील टॉर्च 21 एप्रिल रोजी मात्सुयामा येथे येणार होती.