लंडन
विश्व बास्केटबॉल संघटनेने पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता बास्केटबॉल स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे युरोपियन चॅम्पियनशीप आणि अमेरिका चॅम्पियनशीप बास्केटबॉल स्पर्धाही कोरोना व्हायरस संकटामुळे एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रवक्त्याने दिली. कोरोना व्हायरसमुळे सर्व स्पर्धा वेळापत्रके कोलमडली आहेत. आता ती नव्याने तयार करावी लागतील. ऑलिम्पिक पात्रता पुरुषांची स्पर्धा 23 ते 29 जून दरम्यान आयोजित केली होती. पण आता ही स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सदर स्पर्धा 22 जून ते 4 जुलै दरम्यान घेतली जाईल, असे विश्व बास्केटबॉल फेडरेशनच्या नियंत्रण समितीने जाहीर केले. आहे. त्याचप्रमाणे पुरुषांची युरो बास्केटबॉल स्पर्धा तसेच अमेरिका चषक बास्केटबॉल स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या स्पर्धा 2022 मध्ये घेतल्या जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.