भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर
मेलबर्न / वृत्तसंस्था
भारताविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 17 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात विल पुकोस्की व कॅमेरुन ग्रीन यांच्यासह 5 पदार्पणवीरांचा समावेश आहे. टीम पेनच्या नेतृत्वाखालील संघातील अन्य नवोदित खेळाडूंमध्ये जलद गोलंदाज सीन ऍबॉट, लेगस्पिनर मिशेल स्वेप्सन व अष्टपैलू मायकल नेसर यांची वर्णी लागली आहे.
या नवोदित खेळाडूंनी अलीकडील कालावधीत देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिले आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नमूद केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ते ट्रेव्हर हॉन्स यांनी यावेळी विल पुकोस्की व ग्रीन यांचा प्राधान्याने उल्लेख केला. यातील काही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाचे अन्य क्रिकेट प्रकारात प्रतिनिधीत्व केले आहे.
ऑस्ट्रेलियाला यापूर्वी 2018-19 मध्ये प्रथमच बोर्डर-गावसकर चषक गमवावा लागला होता. आता त्यावर पुन्हा कब्जा करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने त्यांनी नवोदितांना संधी देणे पसंत केले. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच मायदेशात पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध सरस कामगिरी साकारली. त्यानंतर तोच कित्ता भारताविरुद्ध गिरवण्याचे त्यांचे लक्ष्य असणार आहे. कसोटी संघात निवडले गेलेले खेळाडू ऑस्ट्रेलियन ताफ्यात दाखल होतील.
27 नोव्हेंबरपासून प्रारंभ
या दौऱयात दोन्ही संघात 3 वनडे, 3 टी-20 व 4 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 27 नोव्हेंबरपासून या मालिकेला प्रारंभ होत आहे. कसोटी संघात जागतिक स्तरावरील अव्वलमानांकित पॅट कमिन्सवर मुख्य धुरा असणार आहे. निवडकर्त्यांनी यावेळी 19 सदस्यीय ऑस्ट्रेलियन अ संघाची देखील घोषणा केली असून त्यात कसोटी संघातील 9 खेळाडूंचा समावेश आहे.
मागील कालावधीत ऑस्ट्रेलियातील काही माजी खेळाडूंनी पुकोस्कीला संधी देण्याची मागणी केली होती. 22 वर्षीय पुकोस्कीने शेफिल्ड शील्ड स्पर्धेत सलग दोन द्विशतके झळकावत आपल्यातील गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. पुकोस्कीची स्पर्धा प्रामुख्याने खराब फॉर्ममधील जो बर्न्सशी असेल. जो बर्न्सला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने झगडावे लागले असून यामुळे त्याच्यावर बरेच दडपण आहे. सध्या मिळालेल्या संकेतानुसार, अनुभवी डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर व पुकोस्की सलामीला फलंदाजीला उतरु शकतात. पुकोस्कीने शील्डमधील 2 लढतीत 247.50 च्या अविश्वसनीय सरासरीने 495 धावांची आतषबाजी केली होती.
ऑस्ट्रेलियन कसोटी संघ : टीम पेन (कर्णधार), सीन ऍबॉट (उपकर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमेरुन ग्रीन, जोश हॅझलवूड, ट्रव्हिस हेड, मार्नस लाबुशाने, नॅथन लियॉन, मिशेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोस्की, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.
ऑस्ट्रेलियन अ संघ : सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, जो बर्न्स, जॅक्सन बर्ड, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), हॅरी कॉन्वे, कॅमेरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्यूज, निक मॅडिसन, मिशेल मार्श (तंदुरुस्तीवर अवलंबून), मायकल नेसर, टीम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोस्की, मार्क स्टेकेटी, विल सुदरलँड, मिशेल स्वेप्सन.
भारतीय संघ सिडनीत दाखल, क्वारन्टाईनला प्रारंभ
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यांचे भारतीय पथक गुरुवारी सिडनीत दाखल झाले असून त्यांच्या क्वारन्टाईन कालावधीला याचवेळी प्रारंभ झाला. सिडनी मुख्य शहराबाहेर वसलेल्या सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये संघाचा मुक्काम असणार आहे. भारतीय संघ येथे 14 दिवस क्वारन्टाईन असेल आणि यावेळी ते सरावाला देखील सुरुवात करतील.
भारतीय पथकासमवेतच आयपीएलमध्ये खेळलेले डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स हे देखील गुरुवारी दुपारी सिडनीत आले आणि थेट सिडनी ऑलिम्पिक पार्कला रवाना झाले. न्यू साऊथ वेल्स प्रशासनाने भारतीय संघाला क्वारन्टाईन कालावधीत सरावाची मुभा दिली असून यामुळे भारतीय खेळाडू ब्लॅकटाऊन इंटरनॅशनल स्पोर्टस् पार्कवर सरावाला सुरुवात करु शकतील. हा परिसर देखील बायो-बबल प्रणालीचा भाग असेल.
विराट कोहलीला मिळणार ‘स्पेशल ट्रीटमेंट’!
ऍडलेड कसोटी सामन्यानंतर आपल्या पहिल्या अपत्याच्या आगमनासाठी मायदेशी रवाना होणाऱया भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी क्वारन्टाईन कालावधीत ऑस्ट्रेलिया स्पेशल ट्रिटमेंट देईल, अशा आशयाचे वृत्त डेली टेलिग्राफने दिले आहे. या वृत्तानुसार, पुलमॅन हॉटेल व्यवस्थापन भारतीय कर्णधारासाठी पेंटहाऊस सूट आरक्षित ठेवणार आहे. एरवी ऑस्ट्रेलियाचा महान रग्बी खेळाडू ब्रॅड फिटलरसाठी हा पेंटहाऊस सुट आरक्षित असतो.
एनएसडब्ल्यू प्रशासनाने भारतीय खेळाडूंच्या निवडक कुटुंबियांना दौऱयात सामावून घेण्याची मुभा दिली असून त्यांनाही नियमानुसार क्वारन्टाईन शिष्टाचार पाळावे लागणार आहेत. युएईमधील आयपीएल स्पर्धेत खेळलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू दि. 22 रोजी आपल्या राष्ट्रीय पथकात दाखल होतील. उभय संघातील मर्यादित षटकांचे सामने दि. 27 पासून खेळवले जाणार आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेची रुपरेषा
तारीख / सामना / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
27 नोव्हेंबर / पहिली वनडे / सकाळी 9.10 वा. / सिडनी
29 नोव्हेंबर / दुसरी वनडे / सकाळी 9.10 वा. / सिडनी
2 डिसेंबर / तिसरी वनडे / सकाळी 9.10 वा. / कॅनबेरा
4 डिसेंबर / पहिली टी-20 / दुपारी 1.40 वा. / सिडनी
6 डिसेंबर / दुसरी टी-20 / दुपारी 1.40 वा. / सिडनी
8 डिसेंबर / तिसरी टी-20 / दुपारी 1.40 वा. / सिडनी
17 ते 21 डिसेंबर / पहिली कसोटी / सकाळी 9.30 वा. / ऍडलेड
26 ते 30 डिसेंबर / दुसरी कसोटी / पहाटे 5 पासून / मेलबर्न
7 ते 11 जानेवारी / तिसरी कसोटी / पहाटे 5 पासून / सिडनी 15 ते 19 जानेवारी / चौथी कसोटी / पहाटे 5 पासून /ब्रिस्बेन