वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे रविवारी पाकमध्ये आगमन झाले. या दौऱयामध्ये ऑस्ट्रेलिया आणि यजमान पाक यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका तसेच त्यानंतर वनडे आणि टी-20 मालिका खेळविला जाणार आहे. 1998 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ पाकमध्ये विविध मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे.
इस्लामाबादमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे रविवारी आगमन झाले. त्यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुमारे 4000 पोलीस आणि सेनादलातील जवान उपस्थित होते. ऑस्ट्रेलियन संघाला कडक सुरक्षा व्यवस्थामध्ये हॉटेलकडे नेण्यात आले. 4 मार्चपासून ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यातील पहिल्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. उभय संघातील वनडे मालिका 29 मार्चपासून खेळविली जाईल तर एकमेव टी-20 सामना 5 एप्रिलला होणार आहे. 1998 साली ऑस्ट्रेलियाने पाकच्या दौऱयात तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली होती तर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकचा व्हाईटवॉश केला होता.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), ऍगेर, बोलँड, कॅरे, ग्रीन, हॅरीस, हॅजलवूड, हेड, इंग्लीस, उस्मान ख्वाजा, लाबुशाने, लेयॉन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, स्टीकेटी, स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर, राखीव खेळाडू- ऍबॉट, डुगेट, मॅडिनसन आणि रेनशॉ.
ऑस्ट्रेलिया वनडे व टी-20 संघ- फिंच (कर्णधार), ऍबॉट, ऍगेर, बेरेनडॉर्फ, कॅरे, इलीस, ग्रीन, हेड, इंग्लीस, लाबुशाने, मिचेल मार्श, मॅकडरमॉट, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, स्टोइनीस आणि झाम्पा.