वृत्तसंस्था/ ढाक्का
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान बांगलादेशचा 6 चेंडू बाकी ठेवून तीन गडय़ांनी पराभव केला. या मालिकेत बांगलादेशने पहिले सलग तीन सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्याने ऑस्ट्रेलियाचा हा औपचारिक विजय आहे.
शनिवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 9 बाद 104 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 7 बाद 105 धावा जमवित विजय नोंदविला. या मालिकेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर 3-1 आघाडी घेतली असून आता शेवटचा आणि पाचवा सामना सोमवारी येथे खेळविला जाईल.
बांगलादेशच्या डावात सौम्या सरकारने 8, शकीब अल हसनने 15, अतिफ हुसेनने 20, मेहदी हसनने 23 धावा जमविल्या. कर्णधार मेहमुदुल्ला आणि यष्टीरक्षक नुरूल हसन यांना आपले खाते उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्वेप्सनने 12 धावांत 3 तर टायने 3 बळी मिळविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डॅन ख्रिस्तियनने आक्रमक फलंदाजी करत 5 षटकांरासह 39 धावा झोडपल्या. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या ऍगरने 27 चेंडूत 27 धावा जमविल्या. बांगलादेशच्या मुस्तफिजुर रेहमानने 2 बळी मिळविले. मेहदी हसनने मार्शला 11 धावांवर त्रिफळाचीत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्वेप्सनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने हा सामना 1 षटक बाकी ठेवून जिंकला.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकांत 9 बाद 104 (मेहदी हसन 23, अतिफ हुसेन 20, शकीब अल हसन 15, स्वेप्सन 3-12, टाय 3 बळी), ऑस्ट्रेलिया 19 षटकांत 7 बाद 105 (ख्रिस्तियन 39, मार्श 11, ऍगर 27, मुस्तफिजुर रेहमान 2 बळी).