वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
पंतप्रधान नरेंद मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या सागरी सुरक्षेवर होणाऱया खुल्या चर्चेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. यात संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष, संयुक्त राष्ट्रसंघाच्या यंत्रणा आणि प्रमुख क्षेत्रीय संघटनांचे उच्चाधिकारी भाग घेणार आहेत. या बैठकीचे युएनएसीच्या संकेतस्थळावर थेट प्रसारण होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन देखील या बैठकीत सामील होतील.
खुल्या चर्चेत सागरी चाचेगिरी आणि असुरक्षिततेला प्रभावीपणे तोंड देणे आणि सागरी क्षेत्रात समन्वयन मजबूत करण्याच्या पद्धतींवर भूमिका मांडली जाईल. सुरक्षा परिषदेने सागरी सुरक्षा आणि गुन्हय़ांच्या पैलूंवर चर्चा करत अनेक प्रस्ताव संमत केले आहेत. अशाप्रकारच्या खुल्या चर्चेत सागरी सुरक्षेला विशेष अजेंडय़ात सामील करून चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
कुठलाच देश स्वबळावर सागरी सुरक्षेच्या सर्व आव्हानांना तोंड देऊ शकत नाही. या मुद्दय़ावर सुरक्षा परिषदेत विचारविनिमय होणे गरजेचे आहे. सागरी सुरक्षेसाठी व्यापक दृष्टीकोन विकसित करणे आणि सागरी क्षेत्रात धोक्यांना तोंड देत सुरक्षित वाहतुकीला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे.
युएनएससीचे अध्यक्षत्व भारताकडे
सुरक्षा परिषदेकडे जगभरात शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी आहे. भारताला जगातील या सर्वात शक्तिशाली संस्थेचे अध्यक्षत्व मिळाले आहे. भारताने 1 ऑगस्ट रोजी फ्रान्सकडून ही जबाबदारी स्वीकारली आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एका बैठकीचे अध्यक्षत्व पंतप्रधान मोदींकडे असणार आहे. मागील 75 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताचा पंतप्रधान सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळणार आहे.