वृत्तसंस्था/ लाहोर
नॅथन लियॉनच्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर शुक्रवारी येथे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकचा 1-0 असा पराभव केला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळाच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने यजमान पाकचा 115 धावांनी दणदणीत पराभव केला.
तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकच्या भूमीत कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णीत राहिले होते. या शेवटच्या सामन्यातील खेळाच्या चौथ्या दिवशी पाकचा संघ चिवट फलंदाजी करत ही लढत अनिर्णित राखेल, असे वाटत होते. पण लियॉनच्या फिरकी गोलंदाजीसमोर पाकचा डाव कोलमडला. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 391 धावांवर घोषित केल्यानंतर पाकने पहिल्या डावात 268 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 123 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 3 बाद 227 धावांवर घोषित करून पाकला निर्णायक विजयासाठी 351 धावांचे आव्हान दिले. पाकने आपल्या दुसऱया डावाला सावध सुरुवात केली होती. शफीक आणि इमाम उल हक यांनी सलामीच्या गडय़ासाठी 77 धावांची भागीदारी केली. ग्रीनने शफीकला झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. लियॉनने अझहर अलीला 17 धावांवर बाद केले. इमाम उल हकने 199 चेंडूत 5 चौकारांसह 70 धावांचे योगदान दिले. तो लियॉनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर पाकचे फलंदाज अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकले नाहीत. कर्णधार बाबर आझमने एकाकी लढत देत 104 चेंडूत 6 चौकारांसह 55 धावा झळकविल्या. आलमने 11, साजिद खानने 4 चौकारांसह 21 तर हसन अलीने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. चहापानापूर्वी बाबर आझमला हेडकडून जीवदान मिळाले होते. पण या जीवदानाचा त्याला अधिक लाभ घेता आला नाही. अझहर अलीची ही 94 वी कसोटी होती. 92.1 षटकात पाकचा दुसरा डाव 235 धावात आटोपला. लियॉनने 83 धावात 5 तर कर्णधार कमिन्सने 23 धावात 3 तसेच स्टार्क आणि ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बऱयाच वर्षानंतर पाकच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका यजमान संघाला राखता आली नाही.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प. डाव 391, पाक प. डाव 268, ऑस्ट्रेलिया दु. डाव 3 बाद 227 (डाव घोषित), पाक दु. डाव 92.1 षटकात सर्वबाद 235 (इमाम उल हक 70, शफीक 27, बाबर आझम 55, साजिद खान 21, अझहर अली 17, हसन अली 13, आलम 11, लियॉन 5-83, कमिन्स 3-23, स्टार्क 1-53, ग्रीन 1-18).