ऑस्ट्रेलियाचे 468 धावांचे आव्हान, इंग्लंड 4 बाद 82
वृत्तसंस्था/ ऍडलेड
ट्रव्हिस हेड, मार्नस लाबुशाने (प्रत्येकी 51) व गोलंदाज झाय रिचडर्सन (2 बळी) यांच्या कामगिरीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला येथे सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीत विजयाची संधी निर्माण झाली आहे. यजमानांनी दुसरा डाव 9 बाद 230 धावांवर घोषित करून 468 धावांचे आव्हान दिल्यानंतर इंग्लंडची दुसऱया डावात 4 बाद 82 अशी पडझड झाली असून त्यांना विजयासाठी अजून 386 धावांची गरज आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, बेन स्टोक्स 3 धावांवर खेळत होता. जो रूट 24 धावांवर बाद झाल्यानंतर खेळ थांबवण्यात आला. 1 बाद 20 या धावसंख्येवरून शेवटच्या सत्रात इंग्लंडने खेळ पुढे सुरू केला आणि रोरी बर्न्स व डेव्हिड मलान (20) यांनी आणखी 28 धावांची भर घातली. मायकेल नेसरने मलानला बाद करून ही जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले. बर्न्सला साथ देण्यासाठी यानंतर कर्णधार रूट मैदानात उतरला. ही जोडी जमतेय असे वाटत असतानाच 31 व्या षटकात झाय रिचर्डसनने ही जोडी फोडली. त्याने बर्न्सला स्मिथकरवी झेलबाद केले. बर्न्सने 95 चेंडूत 34 धावा काढला आणि या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 22 धावांची भर घातली. यावेळी इंग्लंडची स्थिती 3 बाद 70 अशी झाली होती. दिवसाचा खेळ संपण्याच्या सुमारास कर्णधार रूटला स्टार्कने यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करीत ऑस्ट्रेलियाला आणखी एक यश मिळवून दिले. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आणखी सहा बळी मिळविण्याची गरज आहे.
तत्पूर्वी, 1 बाद 45 या धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 61 षटकांत 9 बाद 230 धावांवर घोषित केला. लाबुशाने व हेड यांनी प्रत्येकी 51 धावा जमविल्या. लाबुशानेने यासाठी 96 चेंडू घेतले तर हेडने 54 चेंडूत 7 चौकार फटकावले. इंग्लंडतर्फे रॉबिन्सन, रूट, मलान यांनी प्रत्येकी 2 तर अँडरसन, ब्रॉड यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव 9 बाद 473 डाव घोषित, इंग्लंड पहिला डाव 236, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 61 षटकांत 9 बाद 230 डाव घोषित ः वॉर्नर 13, हॅरिस 23, नेसर 3, लाबुशाने 51 (96 चेंडूत 6 चौकार), स्मिथ 6, हेड 51 (54 चेंडूत 7 चौकार), ग्रीन नाबाद 33, कॅरे 6, स्टार्क 19, रिचर्डसन 8, अवांतर 17. गोलंदाजी ः मलान 2-33, रूट 2-27, रॉबिन्सन 2-54, अँडरसन 1-8, ब्रॉड 1-27). इंग्लंड दुसरा डाव 43.4 षटकांत 4 बाद 82 ः बर्न्स 34, हमीद 0, मलान 20, रूट 24, स्टोक्स खेळत आहे 3, अवांतर 1. गोलंदाजी ः स्टार्क 1-21, रिचर्डसन 2-17, नेसर 1-7.