आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक जेतेपदाची लढत
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे कट्टर पारंपरिक क्रिकेट संघ आज (रविवार दि. 3) आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ विक्रमी सातव्या विजेतेपदासाठी तर इंग्लंडचा संघ या स्पर्धेतील सलग सहाव्या विजयासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, या लढतीला सकाळी 6 वाजता सुरुवात होईल.
वास्तविक, विद्यमान विजेत्या इंग्लिश महिला संघाची यंदा अतिशय खराब सुरुवात झाली होती. पहिले तिन्ही सामने गमावल्यानंतर त्यांचे आव्हानही धोक्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी सलग 5 विजय संपादन करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियन संघ देखील सध्या उत्तम बहरात असून येथे ते सलग 11 व्या विजयासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांनी मागील 11 पैकी एकत्रित 10 विश्वचषक स्पर्धा जिंकले असले तरी आयसीसी वर्ल्डकप फायनलमध्ये त्यांनी आमनेसामने भिडण्याची 34 वर्षांनंतरची ही पहिलीच वेळ असणार आहे. या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषक मोहिमेला महिन्याभरापूर्वी हॅमिल्टन येथे एकाच वेळी सुरुवात केली आणि आता हॅग्ले ओव्हलवर एकाच वेळी ते स्पर्धेची सांगताही करतील.
ऑस्ट्रेलियाला यापूर्वी एकदाच 2000 मध्ये वर्ल्डकप फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. पण, येथे इंग्लंडविरुद्ध त्यांना अर्थातच सर्व आघाडय़ांवर विशेष दक्ष रहावे लागेल. आयसीसी वर्ल्डकप इतिहासात सर्वात रोमांचक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यावेळी न्यूझीलंडविरुद्ध 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडला त्यावेळी पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले आणि ही त्यांची या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात खराब कामगिरी ठरली होती. त्यानंतर इंग्लंडने 2009 साली विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती.
हेन्स, इक्लेस्टोनला विक्रमाची संधी
ऑस्ट्रेलियाने 2020 मध्ये आपल्याच भूमीत टी-20 विश्वचषक जिंकला असून फेब्रुवारीत त्यांनी महिला ऍशेसवर कब्जा केला. आता तोच धडाका यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. उपकर्णधार रॅशेल हेन्स 2013 विश्वचषक जेत्या संघाची सदस्य राहिली असून एकाच वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी तिला आणखी 27 धावांची आवश्यकता आहे. सध्या या निकषावर न्यूझीलंडची डेबी हॉकली आघाडीवर आहे. याशिवाय, फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनला ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टॉनचा स्पर्धेत 23 बळींचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. फुलस्टॉनने 1982 मध्ये हा विक्रम प्रस्थापित केला होता. सध्या इक्लेस्टोनच्या खात्यावर 20 बळी आहेत.
इंग्लंडसमोर खराब क्षेत्ररक्षणाची चिंता
इक्लेस्टोनने यंदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य लढतीत 36 धावात 6 बळी घेतले आणि एखाद्या इंग्लिश गोलंदाजाची विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी सलामी लढतीत इंग्लंडच्या खराब क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 310 धावांचा डोंगर रचला होता. नंतर इंग्लंडला खराब क्षेत्ररक्षणामुळेच विंडीजविरुद्ध धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता.
यंदा दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला धूळ चारत त्यांना स्पर्धेतील तिसऱया पराभवाला सामोरे जाणे भाग पाडले. त्यानंतर इंग्लंडसमोर उर्वरित चारही सामने जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि त्यांनीही भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान व बांगलादेश यांच्यावर सलग मात करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. योगायोगाने 2017 प्रमाणे यंदाही त्यांच्यासमोर द. आफ्रिकेचेच आव्हान होते. ते त्यांनी सहज पार करत अंतिम फेरीत धडक मारली. हिदर नाईट हिच्याकडे यंदा लागोपाठ विश्वचषक जिंकून देणारी पहिली इंग्लिश कर्णधार बनण्याची संधी असेल.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया ः ऍलिसा हिली (यष्टीरक्षक), रॅशेल हेन्स, मेग लॅनिंग (कर्णधार), बेथ मुनी, तहिला मॅकग्रा, इलिसा पेरी/ऍनाबेल सुदरलँड, ऍश्ले गार्डनर, जेस जोनासन, ऍलाना किंग, मेगन स्कट, डॅर्सी ब्राऊन.
इंग्लंड ः टॅमी ब्युमौंट, डॅनिएले वॅट, हिदर नाईट (कर्णधार), नताली स्कीव्हर, ऍमी जोन्स (यष्टीरक्षक), सोफिया डंकली, कॅथरिन ब्रन्ट, सोफी इक्लेस्टोन, केट क्रॉस, चार्ली डीन, अन्या श्रबसोल.
सामन्याची वेळ ः सकाळी 6.30 वा.
कोट्स
आज आम्ही विश्वचषक जिंकू शकलो तर आमच्यासाठी हा इतिहासातील सर्वोत्तम क्षण असेल. येथे जिंकता आल्यास विश्वचषक जेतेपेद कायम राखण्याची सुवर्णसंधी देखील आम्हाला साधता येईल. त्या दृष्टीने आम्ही रणनीती आखत आहोत.
-इंग्लिश कर्णधार हिदर नाईट.
31 वर्षीय स्टार फलंदाज इलिस पेरी आजच्या निर्णायक लढतीत उपलब्ध असण्याची शक्यता असून ती संघात परतल्यास आमचे मनोबल आणखी उंचावेल, यात शंका नाही. एलिस आमची स्पेशालिस्ट बॅटर असेल. मात्र, येथे ती सराव नसल्याने गोलंदाजी करु शकणार नाही.
-ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग.