वृत्त संस्था/ अल अमिरात
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 संघात स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत गुरूवारी स्कॉटलंड-यजमान ओमान यांच्यात ब गटातील सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवारी सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
स्कॉटलंडने पात्र फेरीच्या या स्पर्धेत आपली अपराझ्जत मालिका कायम राखत सुपर 12 संघात आपले स्थान निश्चित केले आहे. आता त्यांचा ब गटातील तिसरा सामना गुरूवारी यजमान ओमान बरोबर होत आहे. सलग विजयामुळे स्कॉटलंडचा आत्मविश्वास निश्चित वाढला असून आता ते यजमान ओमानवर विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पात्र फेरीच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने बलाढय़ बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱया सामन्यात स्कॉटलंडने पापुआ न्यु गिनिया संघाचा 17 धावांनी पराभव केला. पीएनजी संघाचे या पात्र फेरीच्या स्पर्धेतचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यांना सलग 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ब गटातील ओमान आणि बांगलादेश यांनी आपल्या 2 सामन्यांतून प्रत्येकी 1 विजय मिळविला आहे.
स्कॉटलंड संघाचे नेतृत्व कोत्झेर करीत आहे. ओमानचे नेतृत्व झिशान मक्सूदकडे आहे. स्कॉटलंड संघातील फलंदाज बेरिंग्टनने पीएनजीविरूद्ध 49 चेंडूत 70 धावांची खेळी करत संघाला 17 धावांनी विजय मिळवून दिला. स्कॉटलंडचा मॅक्लोड फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी पहिल्या दोन सामन्यात झगडत असल्याचे दिसून आले.
कर्णधार कोत्झेर, क्रॉस बेरिंग्टन हे प्रमुख फलंदाज असून सेफियान शरीफ, डेव्हि, व्हिल आणि इव्हान्स हे प्रमुख गोलंदाज आहेत. गुरूवारच्या सामन्यात स्कॉटलंडवर विजय मिळविण्यासाठी ओमान संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही दर्जेदार कामगिरी करावी लागेल. ओमान संघातील बट्ट, बिलाल खान, मक्सूद यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील. इलियास, कर्णधार मक्सूद, जतिंदर सिंग, संदीप गौड, सुरजकुमार हे प्रमुख फलंदाज आहेत.