हालचाली सुरु : आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश : एकाच छताखाली 100 बेडची व्यवस्था
- नवे सेंटर जिल्हा कोविड रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर
- प्लंबिंग, लाईट, पायाभूत सुविधांच्या कामास सुरुवात
- आणखी दोन खासगी इस्पितळे कोविड उपचारांसाठी राजी
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जिल्हय़ात वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या पहिल्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांसाठी ओरोस येथील क्रीडा संकुलाच्या भव्य हॉलमध्ये 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्याबाबत प्रशासकीय स्तरावर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. आमदार वैभव नाईक यांनी रुग्णांची वाढती परवड लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
सिंधुदुर्गात आता कोविड रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढू लागली आहे. सध्या जिल्हा कोविड रुग्णालयात 350 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित जिल्हय़ातील इतर केअर सेंटरची अवस्था काहीशी अशीच आहे. त्यामुळे फारशी लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मात्र आता कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई-बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरच्या धर्तीवर जिल्हा कोविड रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रीडा संकुलात 100 बेडची व्यवस्था असलेले स्वतंत्र कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली होती. या मागणीचे रुपांतर आता वास्तवात उतरत असल्याचे दिसत आहे.
केअर सेंटरबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, एकंदर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. 100 बेडचे हे सेंटर वास्तवात आणण्यासाठी क्रीडा संकुलात प्लंबिंग, लाईट, स्वच्छता व इतर पायाभूत स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत. या सेंटरसाठी क्रीडा संकुल निवडण्याचं कारण हेच की, ही इमारत जिल्हा कोविड रुग्णालयानजीक असल्यामुळे गरज पडतील त्यावेळी वा इमर्जन्सीच्यावेळी या ठिकाणी जिल्हा कोविड रुग्णालयातून तातडीने डॉक्टर व कर्मचारी पुरवता येतील. हे सेंटर सुरु झाले की कोविड रुग्णांची मोठी सोय या ठिकाणी होणार आहे. या सेंटरचे काम लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न असल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
जिल्हय़ात मालवण येथील डॉ. विवेक रेडकर, कणकवलीतील डॉ. तायशेटे यांच्या हॉस्पिटलबरोबरच आता खासदार नारायण राणे यांचे लाईफ टाईम हॉस्पिटल व कणकवलीतील आणखी एक खासगी हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी सेवा देण्यास तयार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच उपचार करता-करता कोविडमुळे पॉझिटिव्ह झालेले काही डॉक्टर उपचाराअंती बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसेवेत रुजू होत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. रुग्णांना मिळणारे जेवण, मृतदेहांवरील अंत्यसंस्कार यासाठीही आपण योग्य त्या उपाययोजना केल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.