वार्ताहर /जांबोटी
ओलमणी येथे शॉर्टसर्किटने घराला आग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी घडली.याबाबतची अधिक माहिती अशी की, ओलमणी भवानी गल्लीमधील अनंत नारायण चव्हाण यांचे दुमजली घर आहे. खालच्या मजल्यावर जनावरांचा गोठा व इतर साहित्य असून दुसऱया मजल्यावर त्यांचे वास्तव्य आहे.
रविवारी सकाळी त्यांच्या पहिल्या मजल्यावर शॉर्टसर्किटने आग लागून जनावरांसाठी ठेवलेले गवत व धान्याची काही पोती तसेच प्लास्टिक पाईप्स, शेती अवजारे, अंथरुण व इतर संसारोपयोगी साहित्य जळाल्यामुळे त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
शॉर्टसर्किट झाल्यामुळे प्रथम गवताने पेट घेतला. खालच्या मजल्यावर आग व धूर दिसल्यामुळे चव्हाण कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यामुळे गल्लीतील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. प्रसंगावधान राखून नागरिकांनी प्रथम चव्हाण यांच्या गोठय़ातील जनावरांना दोऱया कापून बाहेर काढले. तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती खानापूर अग्निशमन दलाला कळविल्यानंतर अर्ध्या तासात अग्निशमन दलाचे जवान व पाण्याचा बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग विझविण्यात आली होती. या आगीमध्ये अनंत चव्हाण यांच्या सुमारे एक लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.