सरकारने आवश्यक उपाययोजना राबवावी : आमदार चर्चिल आलेमाव यांची मागणी
प्रतिनिधी / मडगाव
ओल्ड गोवा येथील बासालिका चर्चच्या काही भागाला वाळवी लागली असून सरकारने आवश्यक वाळवी नियंत्रण प्रक्रिया हाती घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली आहे. आपल्या वार्का येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी उचलून धरली.
ओल्ड गोवा येथील सदर बासालिका चर्च वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. जगभरातून या चर्चला लाखो भाविक तसेच पर्यटक भेट देत असतात, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले. जानेवारी महिन्यात या चर्चचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले होते. गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने या चर्चच्या एका भागाला मोठय़ा प्रमाणात वाळवी लागली आहे. ती अन्य भागांमध्ये पसरण्याची शक्मयता आहे. त्यापूर्वी वाळवी नियंत्रण प्रक्रिया चर्चच्या सर्व परिसरात हाती घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
वाळवीमुळे चर्चला धोका निर्माण झाला आहे. ‘गोंयचो सायब’चे पार्थिव या चर्चमध्ये असून लाखो गोमंतकीय तसेच जगभरातील भाविकांच्या भावना या चर्चशी जोडलेल्या आहेत. गोव्यावर कोणतेही संकट आल्यास ‘गोंयचो सायब’ गोमंतकीयांचे रक्षण करतो अशी भावना आहे. अशा स्थितीत या चर्चच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबविण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत आलेमाव यांनी यावेळी व्यक्त केले.