वारसा विभातील कामामुळे ऑगस्टिन टॉवर, चर्चला धोका : पावसाळय़ात भू स्खलनाबरोबरच, पुराचीही शक्यता बळावली
प्रतिनिधी / पणजी
ओल्ड गोवा येथील वारसा स्थळ असलेल्या सेंट ऑगस्टिन टॉवर आणि सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चच्या जवळच असलेल्या भागात झाडे कापून तसेच तेथील मातीचे खोदकाम करुन अन्य ठिकाणी नेऊन भूखंड विकसित करण्यात येत असल्याबद्दल स्थानिक वारसाप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणी कसला प्रकल्प उभा राहणार आहे, तो कोण करतोय याबाबत स्थानिक पंचायतीला काहीच माहिती नाही.
या भागात गेल्या तीनचार वर्षांपासून पणजी – ओल्ड गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे या वारसास्थळात तसेच झाडे कापून होणारे सपाटीकरणाचे काम कदाचित महामार्गाचे तात्पुरते काम असावे असे ओल्ड गोवा ग्रामस्थांना वाटत होते. मात्र कोरोना महामारीच्या संचारबंदीतही हे काम बिनदिक्कतपणे सुरु असल्याने लोकांना संशय आला. त्यामुळे हा सारा प्रकार उघडकीस आला आहे.
मोठी जंगलतोड, भू सपाटीकरण
मोठमोठे जेसीबी, पोकलीन अशी यंत्रे घालून या ठिकाणीची माती ट्रकांच्या ट्रक भरुन दुसरीकडे नेली जात आहे. एकेकाळी वारसा भागातील हरित पट्टा असलेला हा भाग आता एकदम भकास वाटत आहे. येथील झाडे गेली कुठे? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. हा सारा प्रकार दिवसरात्र सुरु असताना त्याला कोणीही आडकाठी आणली नाही. हा प्रकार असाच सुरु राहिल्यास या वारसास्थळाला धोका निर्माण होणार असून पावसाळय़ात भू स्खलन तसेच पुराचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हा प्रकार कायमचा बंद व्हावा
ओल्ड गोवा ग्रामपंचायतीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पंचायतीने याबाबत ओल्ड गोवा पोलिसांना कळवून तेथील काम बंद पाडले. मात्र ते कायमचे बंद झालेले नाही, असे ग्रामस्थांना वाटत आहे. वारसा विभागात, हरितपट्टय़ात हे सपाटीकरण करणाऱयांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
कामाला पंचायतीचा परवाना नाही : मडकईकर
ओल्ड गोव्याच्या सरपंच सौ. जनिता मडकईकर यांनी याविषयी पत्रकारांना सांगितले की, ग्रामपंचायतीच्या लक्षात येताच आम्ही हे काम बंद पाडले आहे. त्या कामासाठी कुणीही पंचायतीकडून परवाना घेतलेला नाही. त्यांच्याकडे जेव्हा परवाना मागण्यात आला तेव्हा त्यांनी दाखविलेला परवाना नगरनियोजन खात्याने दिला असून त्याची मुदतही संपल्याने तो कालबाह्य़ झाल्याचे उघड झाले आहे. परवाना ज्या व्यक्तीच्या नावे आहे, ती लवंदे नामक व्यक्ती ओल्ड गोव्याची स्थानिक नसून सावर्डे भागातील आहे, असेही मडकईकर यांनी नमूद केले.
पावसाळय़ात हाहाकार माजण्याची भीती
ओल्ड गोव्यासाठी अत्यंत घातक असलेल्या अनैसर्गिक प्रकाराने या वारसा स्थळात पावसाळय़ात हाहाकार माजण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी ओल्ड गोव्यातील दोन नाल्यांमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा या सपाटीकरणामुळे, जंगलतोडीमुळे हा धोका अनेक पटीने वाढलेला आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या चारपाच वर्षांपासून ओल्ड गोव्यात गोव्यातील सर्वाधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. अशावेळी अशी अनैसर्गिक विकासकामे झाल्यास पुराचा धोका वाढणार आहे.
या बेकायदा कृत्याला भाजपचे आशीर्वाद : वळवईकर
समाजकार्यकर्ते तथा ओल्ड गोव्याचे पंच सदस्य विशाल वळवईकर यांनी याप्रकरणी सत्ताधारी भाजपचा हात असणार असा आरोप केला असून अशी कामे विरोधक किंवा सामान्य माणसे करु शकत नाहीत, असे म्हटले आहे. या जमिनीचा मालक कोण, ती जमीन कोणी विकत घेतली आहे काय, येथे कोणता प्रकल्प येईल, या साऱया प्रश्नांची उत्तरे माहिती हक्क कायद्याखाली मिळविली जाईल. संचारबंदीचा फायदा घेऊन हे काम कोण करत आहे, याची चौकशी व्हायलाच हवी. आपण काँग्रेस पक्षाचा कुंभारजुवे गट अध्यक्ष म्हणून हा विषय धसास लावणार आहे, असेही ते म्हणाले.