रविवारी 42 जणांचा मृत्यू, 1621 नवे बाधित
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोरोनाबळींची संख्या पुन्हा वाढू लागली असून रविवारी 42 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 30 पर्यंत खाली आलेल्या संख्येमुळे मृत्यूदर उतरत असल्याचे दिसत होते. परंतु शनिवारी त्यात वाढ होत 39 बळी गेले तर रविवारी 42 जण दगावले आहेत. त्याचबरोबर 2545 रुग्ण कोरोनामुक्तही झालेले आहेत.
रविवारी राज्यात 1621 नवीन बाधित आढळून आले आहेत. गत काही दिवसांपासून ही आकडेवारीही वाढत-घटत आहे. तरीही संख्या मात्र दोन हजारांच्या मर्यादेतच स्थीर असल्याचे दिसून आले आहे.
सध्या राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 17277 एवढी आहे, तर एकूण रुग्णसंख्या 146460 वर पोहोचली आहे. गत 24 तासात 2545 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण 126800 जण बरे झाले आहेत. रविवारी 166 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले व 1455 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. बरे होण्याचे प्रमाण 86.58 टक्क्यांवर पोहोचले आहे.
रविवारी बळी गेलेल्या 42 जणांमधील सर्वाधिक 29 मृत्यू गोमेकॉत झाले आहेत. त्याशिवाय दक्षिण जिल्हा इस्पितळात 11, कुडतरी आरोग्य केंद्रात एका व्यक्तीस मृत आणण्यात आले, तर दक्षिण गोवा खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 29 वर्षीय तरुणापासून 90 वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश असून त्यात 27 पुरुष आणि 15 महिला आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
सर्व केंद्रांमधील रुग्णसंख्येत होतेय घट
राज्यातील 33 पैकी बहुतेक केंद्रातील रुग्णसंख्या बऱयाच प्रमाणात घटत असून केवळ मडगाव वगळता अन्य सर्वत्र रुग्णसंख्या तीन अंकी संख्येवर आली आहे. मडगाव केंद्रातील रुग्णसंख्या अद्याप चार अंकीच कायम असली तरीही रविवारी तेथेही काही प्रमाणात घट दिसून आली आहे. रविवारी मडगावात 1775 रुग्ण होते. त्याखालोखाल पणजी केंद्रात 973, फोंडा केंद्रात 922 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी आहेत. सर्वात कमी 94 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.