वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सेंट पीटर्सबर्ग करंडक महिलांच्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी सातव्या मानांकित एलेना ओस्टापेंकोने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत इरीना बेगूने झेकच्या सहाव्या मानांकित क्विटोव्हाला पराभवाचा धक्का दिला.
सातव्या मानांकित ओस्टापेंकोने 58 मिनिटांच्या कालावधीत पेटकोव्हिकचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यात लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोने बेसलाईन खेळावर अधिक भर देत विजय मिळविला. ओस्टापेंकोचा पुढील फेरीतील सामना सेसनोव्हिचबरोबर होणार आहे. सेसनोव्हिचने जॅकवेलिनी ख्रिस्टेनचा 6-2, 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. दुसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात इरीना बेगूने झेक प्रजासत्ताकच्या सहाव्या मानांकित आणि या स्पर्धेतील माजी विजेत्या पेत्रा क्विटोव्हाचा 6-4, 6-0 असा पराभव केला. प्रकृती बिघडल्यामुळे तृतीय मानांकित रिबेकिनाने स्पर्धेतून माघार घेतली आहे.