वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोमनियाचीने कँडिडेट्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. तो आता विश्व विजेतेपदाच्या लढतीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर असेल. येत्या नोव्हेंबरमध्ये ही वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा दुबईमध्ये होणार आहे.
आंतरराष्ट्रीय चेस फेडरेशनने (फिडे) मार्च 2020 मध्ये ही स्पर्धा अर्ध्यावरच थांबवली होती. कोव्हिड 19 चा प्रसार रोखण्याचा प्रयत्न म्हणून त्यावेळी रशियाने हवाई वाहतूक बंद केली होती. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना मायदेशी परतणे कठीण गेले असते. हा विचार करून त्यावेळी स्पर्धा अर्ध्यावरच थांबवण्यात आली होती. आठ खेळाडूंच्या सहभागाची ही स्पर्धा रशियातील येकतिरनबर्ग या मॉस्कोपासून 1400 किलोमीटर्सवर असलेल्या शहरात या महिन्यात पुढे सुरू करण्यात आली आणि कोव्हिड 19 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पूर्ण सुरक्षितता बाळगण्यात आली होती.
‘माझ्या कारकिर्दीतील आणि कदाचित माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा माईलस्टोन आहे. मात्र माझ्यासाठी ही स्पर्धा खूप कंटाळवाणी ठरली. कारण एक वर्षभर सतत त्याबद्दलच विचार करीत होतो आणि तयारीही करीत होतो,’ असे 30 वर्षीय इयान म्हणाला. गेल्या वर्षी ही स्पर्धा थांबविण्यात आली त्यावेळी फ्रान्सचा मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्हसमवेत नेपोमनियाची संयुक्त आघाडीवर होता. 24 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा होणार असून 2.4 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस त्यासाठी ठेवण्यात आले आहे.