महाराष्ट्र सरकारने पोलीस आयुक्तांना दिले आदेश
प्रतिनिधी/ मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची अंमलीपदार्थ प्रकरणी तपास तसेच चौकशी करण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांना अधिकृत पत्र पाठवित तपास करण्याचा आदेश दिला आहे.
याप्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून करायचा की अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून करायचा यासंबंधी अद्याप मुंबई पोलिसांनी निर्णय घेतलेला नाही. अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या विनंतीवर विधानसभेत उत्तर देताना मी सांगितले, कंगना रणौत आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेत असून आपल्यावरही जबरदस्ती केली होती असे सांगितले होते. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत.
अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर टीका करताना कंगनाने ट्विट करत आव्हान दिले होते. मुंबई पोलीस आणि गफहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय, असे ट्विट कंगनाने केले होते.