वार्ताहर / झुआरीनगर
कंटेनमेंट झोन हटविण्याच्या मागणीवरून झुआरीनगरातील नागरिक बुधवारी पुन्हा मोठय़ा संख्येने रस्त्यावर आले. कंटेनमेंट झोनमधून हा भाग हटविण्याच्या मागणीबरोबर इतर समस्यां घेऊन मंगळवारीही हे लोक नाकाबंदीजवळ जमा झाले होते. झुआरीनगरातील प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 हे सध्या कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेले आहेत.
सध्या या भागात विविध समस्या सतावत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातील बहुतेक लोक रोजंदारीवर कामाला जातात. सध्या कामासाठी बाहेर जाता येत नसल्याने पैशाचा प्रश्न या लोकांना सतावत आहे. त्याचबरोबर कित्येक दिवस कामाला गेलेले नसल्याने कामावरून कमी करण्याची भीतीही लोकांच्या आहे. त्यासाठी कंटेनमेंट झोनमधून हा भाग हटवावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. या भागात असलेल्या गर्भवती महिलांचा प्रश्न व जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याची समस्याही उपस्थित लोकांनी बोलवून दाखवली.
कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा तसेच दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी सचिन देसाई व पंच सदस्य सतीश पडवळकर यावेळी उपस्थित होते. याविषयी लोकांना समजवण्याचा प्रयत्न आमदार एलिना साल्ढाणा यांनी केला.
समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू
कोविड रूग्णांची वाढती संख्या पाहूनच झुआरीनगरातील हा भाग कंटनमेंट झोन घोषित केलेला आहे. हा निर्णय समितीचा आहे. हा भाग कंटनमेंट झोन मधून हटविण्याचे आपल्या हातात नाही असे यावेळी एलिना साल्ढाणा यांनी सांगितले. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या लोकांच्या सर्व समस्या आपण या समितीबरोबर मांडून मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करणार आहे. हे सर्व जे चालले आहे ते आपल्या आरोग्यासाठीच करीत आहे. तेव्हा आपण सर्वानी धैर्य धरावे असे आवाहन आमदार साल्ढाणा यांनी यावेळी केले. झुआरी कंपनीत कर्मचाऱयांची चाचणी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण तरी सुद्धाा काही दिवस ही कंपनी बंद ठेवून हा प्रसार रोखण्याची आवश्यकता असल्याचे साल्ढाणा यांनी सांगितले.
नागरिकांना आतापर्यंत पूर्ण सहकार्य
झुआरीनगरात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आलेले आहे. व एकूण 1800 कुटुंबानी त्याचा लाभ घेतलेला आहे. पण तरीसुद्धा जर कुणाला या वस्तू मिळाल्या नाहीत तर त्यांना पुरविल्या जातील. तसेच पंधरा दिवसानंतर पुन्हा लोकांना धान्य व इतर वस्तू दिल्या जातील असे उपजिल्हाधिकाऱयांनी सांगितले. झुआरीनगरातील सरकारी शाळेत लोकांच्या चाचण्या होत आहे व कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सुकोर काद्रोस यावर लक्ष ठेवून आहेत. नैसर्गिक विधीसाठी एक नवीन सुलभ शौचालयही उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जर या कंटेनमेंट झोनमधून कुणाला गावी व इतर कामासाठी जायचे असेल तर प्रथम त्यांची चाचणी करूनच त्यांना परवानगी दिली जाईल. परंतु त्यांना पुन्हा भागात घेतले जाणार नाही असे जिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.