प्रतिनिधी/ रत्नािगरी
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या 25 आक्टोबर रोजी रत्नागिरी येथे कार्यक्रमासाठी येत आहेत. मात्र त्यांचा हा दौरा राज्याच्या माहिती कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या चुकीच्या माहिती प्रसिध्दीपत्रकावरून आता चांगलाच गाजत आहे.
हा कार्यक्रम रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर कॉलेज येथे होत आहे. परिसंवादाचा हा कार्यक्रम ‘डिसमॅलटिंग कास्टिजम ः लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेनशियल्स ऑफ हिंदुत्व’ या विषयावर दोन दिवस आहे. तेथे राज्यपाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असा कार्यक्रम असताना राज्याच्या माहिती कार्यालयाकडून चुकीची माहिती 20 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली व ‘डीसमेंटलिंग हिंदुत्व’ असे छापण्यात आले. हीच बातमी वृत्तप्रत्रात प्रसिध्द झाली.
या संदर्भात पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, ऍड. बाबा परूळेकर यांनी सांगितले की, जातीभेदाचे उच्चाटनऐवजी हिंदुत्वाचे विच्छेदन होईल, अशा चुकीच्या अर्थाची बातमी शासकीय पातळीवर देण्यात आली आणि ही केवळ साधी चूक नसून गैरहेतूने व समाजात चुकीचा मेसेज जावा यासाठी राजकीय हेतूने जाणीवतः घडवलेली महाभयानक चूक आहे. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदू धर्मातील जातीभेद निर्मूलन असा परिसंवादाचा विषय आहे. पण हिंदू धर्माचे विच्छेदन असे शासकीय बातमीपत्रामध्ये छापले आहे. शहरातील पतितपावन मंदिर संस्थेतर्फे तसेच रत्नागिरीतील सर्व नागरिकांतर्पे याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
चुकीच्या माहितीच्या सुधारणेसाठी उडाली धावपळ
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या रत्नागिरी दौऱयाचे चुकीच्या माहितीचे प्रसिध्दीपत्रक जारी झाल्यानंतर मात्र माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकाऱयांची अक्षरशः धावपळ उडाली. चुकीच्या माहितीच्या शहानिशेसाठी संबंधितांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱयाबाबतच्या प्रसिध्दीपत्रकात सुधारणा करून योग्य माहितीचे प्रसिध्दीपत्रक अखेर प्रसिध्द करण्यात आले.