पाकिस्तानातील प्रकार ः आधुनिक विचार ठेवणाऱया युवतीची भावाने केली होती हत्या
@ वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानी सोशल स्टार आणि मॉडेल कंदील बलोचची हत्या करणारा तिचा भाऊ मुहम्मद वसीमची 6 वर्षांपूर्वीच तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. बलोचच्या ऑनर किलिंगसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याची मुक्तता करण्यात आली.
मुल्तान शहराच्या एका न्यायालयाने त्याची मुक्तता केली आहे. चालू आठवडय़ाच्या अखेरपर्यंत तो तुरुंगातून बाहेर पडणार असल्याचे वसीमचे वकील सरदार महबूब यांनी म्हटले आहे.
मुहम्मद वसीमने 2016 मध्ये 26 वर्षीय कंदील बलोचची गळा दाबून हत्या केली होत. बलोच स्वतःच्या पोस्ट्समध्ये पितृसत्ताक समाजाच्या विरोधातील स्वतःचे विचार मांडण्यासाठी ओळखली जायची. तिचा भाऊ यामुळे तिच्यावर नाराज होता. स्वतःच्या बहिणीचा जीव घेण्याचे कुठलेच दुःख नाही, कारण तिचे वर्तन सहन करण्यापलिकडे गेले होते असे त्याने हत्येनंतर म्हटले होते.
कंदीलच्या हत्येच्या काही दिवसांनी तिच्या भावाला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सुनावणी सुरू झाल्यावर कंदीलच्या आईवडिलांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. आम्ही आमच्या मुलीच्या मारेकऱयांना (कंदीलचे भाऊ) माफ केले असल्याने हे प्रकरण इथेच संपविण्यात यावे असे त्यांनी म्हटले होते.
कंदीलच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले मुफ्ती अब्दुल काजी, असलम शाहीन, हक नवाज, अब्दुल बासित आणि मोहम्मद जफर हुसैन यांची यापूर्वीच मुक्तता करण्यात आली होती. यातील असलम शाहीन हा कंदीलचा भाऊ आहे.