मुझफ्फरपूर / वृत्तसंस्था
बिहारमध्ये मुझफ्फरपूर जिल्हय़ातील बेला फेज-2 येथील नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. रविवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देतानाच मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.
अपघाताच्या वेळी कारखान्यात अनेक कामगार काम करत होते. मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. संदीपकुमार हा मुसहारी बहादूरपूर छपरा येथील रहिवासी यात ठार झाला असून तो बॉयलर ऑपरेटर म्हणून काम करत होता. या स्फोटामध्ये शेजारी असलेल्या कारखान्यांचेही नुकसान झाले आहे. शेजारच्या कारखान्यांमध्ये काम करणारे दोन जण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पाटणा येथून मदत व बचाव पथक घटनास्थळी पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दिवसभर येथे बचावकार्य आणि तपास सुरू होता.