कणकुंबी ग्रा. पं. ला ग्रामस्थांचे निवेदन
खानापूर / बातमीदार
कणकुंबी ग्राम पंचायतीच्यावतीने चिगुळे गावच्या गायरान जमिनीमध्ये कचरा डेपो उभारण्यात येणार आहे. मात्र, चिगुळे ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. त्या संबंधीचे निवेदन कणकुंबी ग्रा.पं. अध्यक्ष व पीडीओंना ग्रामस्थांनी दिले आहे.
कणकुंबी ग्राम पंचायत हद्दीतील चिगुळे गावाजवळ गायरान जमीन आहे. या जमिनीत गावातील गुरे चरावयास सोडली जातात. गायरानाजवळच प्राथमिक शाळा आहे. शाळेचे विद्यार्थी व गावातील काही युवक या गायरान जमिनीत खेळ-खेळत असतात. शिवाय चिगुळे हे गाव कर्नाटक महाराष्ट्रच्या हद्दीवर वसले आहे. येथे निसर्गसंपन्न परिसर असून दरी व डोंगर आहेत. सदरचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. असे हे निसर्गसंपन्न गाव आहे. गावात स्वच्छता बऱयापैकी आहे. असे असताना ग्राम पंचायतीमार्फत या गावात कचरा डेपो करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या कचरा डेपोमुळे गावच्या सौंदर्याला बाधा पोहचणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कचरा डेपोला विरोध दर्शवला आहे.
निवेदन देताना गावातील नागरिक गणपत गावडे, शशिकांत चौगुले, प्रकाश चौगुले, रामनाथ चौगुले, वासुदेव चौगुले, रामचंद्र गावडे, महादेव नाईक आदींसह महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते..