प्रतिनिधी / कडेगाव
विहापूर (ता. कडेगाव) येथील मुंबईहून आलेल्या 82वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोना चाचणी आज दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला. अशी माहिती कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी दिली. कडेगाव तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण कायम आहे.
विहापूर मेंढ पुनर्वसन वसाहतीतील 82 वर्षीय वृद्ध व्यक्ती, मुलगा सून व दोन नातू असे एकूण पाचजण बुधवारी (ता.3) मुंबई येथून विहापूर येथे आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने या पाच जणांना होम क्वारंटाईन केले होते. दरम्यान यापैकी 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीला सर्दी, ताप व खोकला आदी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी याबाबत आरोग्य विभागाला सांगितले असता आरोग्य विभागाने त्यांना रविवारी (ता.7) मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. काल सोमवारी दि. 8 त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आला आहे.
याबाबतची माहिती कडेगाव तालुका आरोग्य विभागाला मिळताच आरोग्य विभागाने संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीची सून व दोन नातवंडे व शेजारील अन्य दोघे असे एकूण पाच जणांना कडेगाव येथे शासकीय वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यांचे स्वॅब उद्या बुधवारी (दि.10) घेतले जाणार आहेत.दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या मुलासही मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचीही कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
विहापूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव ठाकूर, पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी तात्काळ विहापूर येथे धाव घेवून येथील मेंढ पुनर्वसन वसाहतीचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला. तर या वसाहतीकडे जाणारे सर्व रस्ते सील केले. तर आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने मेंढ पुनर्वसन वसाहत व गावातही रोग प्रतिबंधक औषध फवारणी सुरु करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णाच्या संर्पकात आलेल्यांचा शोध सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.