कोरोनाचे नियम पाळण्यासाठी ग्राम पंचायत सरसावली
प्रतिनिधी / बेळगाव
कडोलीमध्ये कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. याची दखल घेत रविवारी ग्राम पंचायतीकडून सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. कोरोनामुळे जनता हतबल झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन ग्राम पंचायतीतर्फे करण्यात आले आहे. गावात इतर ठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविण्याची गरज असून त्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे हैराण झाला आहे. असे असताना कडोली येथेही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत. कडोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातही सर्दी, ताप व इतर आजारांने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 15 दिवसांपासून या परिसरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी गांभीर्याने दक्षता बाळगणे गरजेचे आहे. उपाययोजना म्हणून कडोली परिसरात औषध फवारणी केली जात आहे. याचबरोबर आरोग्य विभागही दक्षता घेत असला तरी म्हणावा तसा प्रतिसाद नागरिक देत नसल्याचे दिसून येत आहे. जिह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याबाबत आता गांभीर्य घेण्यासाठी ग्राम पंचायतीने पावले उचलली आहेत.