वार्ताहर/ कडोली
कडोली येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असून अहवाल येईपर्यंत सर्व शिक्षकांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकतीच शाळा सुरू केली असतानाच कडोली येथील सरकारी माध्यमिक शाळेतील एक शिक्षिकाच कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून आढळली असून या शिक्षिकेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दि. 28 डिसेंबर 2020 रोजी सदर शिक्षिकेचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण त्या शिक्षिकेला श्वसनाचा व इतर आजाराचा त्रास जानवू लागल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल येईपर्यंत सर्व शिक्षक शिक्षिकांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. हळ्ळीकेरी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आली आहे.
संपूर्ण शाळा सॅनिटाईज झाल्यानंतर बुधवार दि. 6 पासून सदर शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तसेच शाळेत हंगामी स्वरुपात नवीन शिक्षकांना नियुक्त करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे आणि ग्राम पंचायतीने माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू मायाण्णा यांनी पाहणी केली.
ग्रा. पं. कडून सॅनिटाईज
कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्य़ाच्या पार्श्वभूमीवर येथील आमराईतील कन्नड माध्यमिक शाळेची संपूर्ण इमारत कडोली ग्राम पंचायतीच्यावतीने तातडीने सॅनिटाईज करण्यात आली.